मुंबई : थायलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेऊन त्यांना बेकायदा कॉलसेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी कॉलसेंटरद्वारे अमेरिका, युरोप व कॅनडातील नागरिकांची सायबर फसवणूक करत होते. तेथील भारतीय वकिलातीलकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका झाली असून त्यातील एकाच्या तक्रारीवरून मुंबईत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

तक्रारदार तरुण ठाण्यातील रहिवासी आहे. त्याच्या तक्रारीवरून लाओस देशात राहणारे जेरी जेकब, गॉड फ्री व सनी यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी वसूल करणे, डांबून ठेवणे व फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक, नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद नसल्याचा दावा

तक्रारदाराचे एक नातेवाईक विलेपार्ले येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्यामार्फत तक्रारदाराची ओळख परदेशात नोकरी देणाऱ्या दलालांशी झाली. त्यांनी थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला थायलंडमध्ये पाठवले. तेथून बोटीच्या साह्याने बेकायदेशिररित्या तक्रारदार व तेथे गेलेल्या इतर भारतीय तरुणांना लाओस देशात नेण्यात आले. तेथे टास्क देण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या एका कॉलसेंटरमध्ये या तरुणांना काम करण्यास भाग पाडण्यात आले. तेथे सुमारे ३० भारतीय तरुण काम करत होते. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत असे. नेहमीच्या जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधून हा सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल काढून घेतले. तसेच भारतीय वकिलातीकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांना खुर्चीला बांधून त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले. मोबाईलमधील सर्व तपशीलही आरोपींनी डिलिट केला.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

आरोपींनी तक्रारदाराकडून २०० चीनी युआन खंडणी म्हणून काढून घेतले. अखेर स्थानिक भारतीय वकिलातीमार्फत चार तरुणांना तेथून भारतात परत आणण्यात आले आहे. याप्रकरणी भारतात परत आल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे कक्ष-८ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.