Chhatra Bharati programme मुंबईच्या विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात होणाऱ्या छात्र भारती संघटनेच्या संमेलनाला गुरूवारी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. या संमेलनात गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी Jignesh Mevani आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद Umar Khalid यांची भाषणे होणार होती. मात्र, आज ऐनवेळी पोलिसांकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे छात्र भारतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच, असा निर्धार छात्र भारतीने व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या भाईदास सभागृहाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हटवण्यात आले आहे. सध्या भाईदास सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे छात्र भारतीचा आजचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.

भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यक्रमाला परवानगी न देण्यात आल्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, आमचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारून आमचा अपेक्षाभंग केला आहे. पोलिसांनी मुंबईत १४४ कलमही लागू केले आहे. मात्र, आता कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच, असे छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून, पहिल्या सत्रातच जिग्नेश आणि उमर बोलणार आहेत. मात्र, त्यांच्याकडून भीमा कोरेगाव घटनेवर भाष्य केले जाण्याची शक्यता आहे. बुधवारी महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या तोडफोडीनंतर त्यांच्या या वक्तव्याने आणखी तणाव निर्माण होऊ नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे समजते. मात्र, जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या सत्रातच भाषण करण्यासाठी येतील, असे छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पार्ल्यात काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.