मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार (८२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. रत्नागिरी मराठा उद्योजक फोरमच्या बैठकीसाठी ते मुंबईहून तेथे गेले होते. तेथून परत येताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड आदींच्या पुढाकाराने १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारूपाला आणली. ‘मराठा बिझनेसमेन फोरम’ या संस्थेचा पसाराही त्यांनी वाढविला.अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. तसेच गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना केली.