Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे याला न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने भावेश भिंडेची कोठडी २९ मे पर्यंत वाढवली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून १७ जणांचा बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली होती. भावेश भिंडेंची जाहिरात कंपनी दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचं संचालन करत होती. होर्डिंग दुर्घटनेनंतर भिंडे फरार झाला होता. मात्र पोलिसांनी उदयपूरपर्यंत त्याचा माग काढला आणि त्याच्या मुसक्या आवळून आज (२६ मे) न्यायालयासमोर हजर केलं.

मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला होता. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा त्या कंपनीचा संचालक असल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर पोलीस भावेश भिंडेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील राहत्या घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच तो फरार झाला. पोलिसांनी त्याचं शेवटचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की तो लोणावळ्यात आहे. त्यानुसार पोलीस लोणावळ्याला गेले. मात्र तो तिथूनही फरार झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १६ मे रोजी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली आणि मुंबईत आणलं.

भावेश भिंडे याच्याविरोधात आतापर्यंत २३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हादेखील दाखल आहे. याचवर्षी २४ जानेवारी रोजी मुंलुंड पोलीस ठाण्यात भावेशविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. भिंडे हा १९९८ पासून जाहिरातीच्या व्यवसायात असून त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा महापालिकेने दंड ठोठावला आहे. जाहिरात फलक लावल्याप्रकरणी या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्याविरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण ६ इतर गुन्हे दाखल असून यापैकी चार गुन्हे मुलुंड आणि दोन गुन्हे सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

हे ही वाचा >> “सपाचा कायदा-सुव्यवस्थेशी ३६ चा आकडा, त्यांनी दहशतवाद्यांना…”, मिर्झापूरमधून पंतप्रधान मोदींचा टोला

भावेश भिंडे इगो मीडिया या कंपनीचा संचालक होण्याआधीच या कंपनीला घाटकोपर येथील जाहिरात फलकाची परवानगी मिळाली होती. त्यापूर्वीही भिंडेचे या कंपनीबरोबर व्यवहार झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. पोलीस त्याची पडताळणी करत आहेत. भिंडेवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळे त्याला एकप्रकारे काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यामुळे त्याने दुसऱ्याच्या सहकाऱ्याच्या नावावर कंपनी स्थापन करून हा व्यवहार केल्याचा संशय असून त्याची तपासणी पोलीस करत आहेत.