मुंबई: रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाइल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी काही मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुर्ला कसाईवाडा परिसरात एक इसम चोरलेले काही मोबाइल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात बुधवारी सायंकाळी सापळा रचला. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून झडती घेतली असता, त्याच्याजवळ काही मोबाइल सापडले. गर्दीच्या वेळी हा आरोपी रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरत होता. त्यानंतर ते मोबाइल तो एका व्यक्तीला विकत होता.

हेही वाचा – मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

हेही वाचा – मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

या आरोपीविरोधात विविध लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.