मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

एप्रिल व मे महिन्यांमध्ये उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामध्ये तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा शरीरात असते. या यंत्रणेचे कार्य विस्कळीत झाल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने पाणी पिणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी येत्या काळात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिला.

हेही वाचा…मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उकाडा वाढत आहे. वाढत्या उन्हामध्ये सातत्याने काम करणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, लघुशंका करताना जळजळ होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखा त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल्स आदींचा वापर करावा. तसेच सोबत पाण्याची बाटली ठेवावी, सतत पाणी पिऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, पाण्याचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. अधिकाधिक फळे खावी. त्यामुळे वाढत्या उन्हाचा फारसा त्रास होणार नाही, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

हेही वाचा…अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर

उन्हाच्या तडाख्यात थकवा येणे, चक्कर येणे, ताप येणे व पराकोटीच्या स्थितीत उष्माघात होणे, निर्जलीकरण होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कामाशिवाय दुपारी घरा बाहेर फिरू नये. उन्हात जायची वेळ आली तर टोपी, पागोटे, दुपट्टा, पदर, रुमाल इत्यादीने डोके झाकून घ्यावे. शक्य होईल तेव्हा व तितके सावलीत जावे. सुती, सैल कपडे घालावेत. सफेद कपडे उपयुक्त असतात. खूप घाम येत असेल तर अधिक पाणी प्यावे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः जे उन्हात फिरून काम करतात, शेती करतात, घराबाहेर शारीरिक श्रमाची कामे करतात त्यांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्याव्यातिरिक्त ताक, पेज, लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते, असे नायर रुग्णालयाच्या जनऔषध विभागाच्या प्रमुख डॉ. ऋजुता हाडये यांनी सांगितले.