मुंबई : सायकल काढण्यावरून झालेल्या वादातून पिता-पुत्राने केलेल्या मारहाणीत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गिरगाव येथे घडली. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.

गिरगाव येथील मुगभाट लेनमधील पारिजात सदन परिसरात ही घटना घडली. मृत मुकेश मोरजकर (५५) यांचा मुलगा इमारतीच्या खालीच सायकल उभी करतो. त्यावरून झालेल्या वादातून विपुल राऊत (३२) व विकास राऊत (६२) यांनी मोरजकर यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भींतीवर आपटले, असे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीनंतर मोरजकर खाली कोसळले. त्यांना तत्काळ जीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा – नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल

हेही वाचा – मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक

याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मोरजकर यांची पत्नी मोहिनी मोरजकर यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि राऊत पिता-पुत्राने पतीला मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी विकास व विपुल या दोघांना गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरातून अटक केली.