मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या सिझन मध्ये ‘पुणेरी पलटण’चा स्टार खेळाडू असलेला पंकज मोहिते हा मुंबईतील वडाळा येथील गणेश नगर या झोपडपट्टीतील राहणारा आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेला पंकज सध्या प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जिथे तो राहत असे त्या झोपडपट्टी भागात त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि त्यात प्राविण्य मिळविले. पुणेरी पलटणची भिस्त सध्या पंकजवर असून त्याची टीम उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आपल्या संघासाठी अधिकाधिक चषक जिंकून देण्याच्या त्याच्या उद्दिष्टाबरोबर त्याला त्याच्या आईने आणि कुटुंबाने पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे आहे.

प्रो कबड्डी लीगचा सध्या दहावा सीझन सुरू असून यामध्ये पुणेरी पलटण या संघाकडून पंकज मोहीते हा खेळाडू खेळत आहे. त्याच्या खेळाची कबड्डीप्रेमींमध्ये चर्चा आहे. मुंबईकर असलेला पंकज मोहिते हा वडाळा येथील गणेशनगर झोपडपट्टीत वाढलेला आहे. वयाच्या १२ वर्षी नववीत असताना त्याचे वडील वारले. संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या आईवर आणि चार बहिणींपैकी सर्वात मोठ्या असलेल्या बहिणीवर आली. आईने घरकामासारखी छोटी-मोठी कामे केली तर बहिणीने कॉलेज करत ट्युशन वगैरे देत घराची जबाबदारी घेतली. अतिशय खडतर परिस्थितीतून वर आलेल्या पंकजने आपले नाव क्रिडा जगतात मोठे केले आहे.

हेही वाचा >>>कर्करोगावर उपचार १०० रुपयांत, या गोळीचे फायदे काय? टाटा इनस्टिट्युटच्या डॉक्टरांचा दावा काय?

पंकज जिथे राहत होता असे त्या झोपडपट्टी भागात त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि त्यात प्राविण्य मिळविले. पुढे अनेक टूर्नामेंट तो खेळला आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बनला. तो आज ‘पुणेरी पलटण’चा विश्वासार्ह असा खांब बनला आहे. आपल्या शेजारच्या सवंगगड्यांबरोबर तो राहत असलेल्या ठिकाणी मैदानात कबड्डी खेळत असे. आपल्या या प्रवासाबद्दल पंकज सांगतो की, घरच्या गरिबीमुळे पालिकेच्या शाळेत जायचो. चौथीत मी खासगी शाळेत गेलो आणि तिथे मग आम्ही शाळेच्या फरशीवर कबड्डी खेळायचो. वार्षिक क्रीडा महोत्सवात भाग घ्यायचो. एका वर्षी मी निवड प्रक्रियेत भाग घेतला आणि संघासाठी निवडला गेलो. मी त्यानंतर अंडर-१४ आणि अंडर-१७ साठी खेळलो आणि कित्येक सामने जिंकले.

तो पुढे सांगतो, “मी वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कनिष्ट महाविद्यालयासाठी खेळत होतो. तेथे मला राजेश पाडवे सरांनी त्यांच्या महर्षी दयानंद (एम डी) महाविद्यालयात येण्यासाठी आणि त्यांच्या संघासाठी खेळण्याचे आवाहन केले. मी बारावीनंतर मग परळ येथील एम डी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मला एका बँकेसाठी खेळायची ऑफर आली. मला महिन्याला २५०० रुपये पगार मिळू लागला. पण हा पगार मला प्रोटीन आणि इतर जे अतिरिक्त आहार घ्यावा लागतो त्यासाठी पुरेसा नव्हता. त्यासाठी पैसे मिळावेत म्हणून मग मी अनेक इतर टूर्नामेंटसाठी आणि इतर संघांसाठी खेळू लागलो. त्यातील बक्षिसांमध्ये मिळणारे पैसे आम्ही वाटून घ्यायचो. त्यातून माझा प्रोटीन आणि इतर आहार निघायचा, असेही तो सांगतो.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खाजगी कंपन्यांसाठी खेळायची संधी मिळाल्यानंतर कनिष्ठ राष्ट्रीय संघात खेळताना त्याने आपली चमक दाखवली आणि कित्येक पदके जिंकली. त्यात एअर इंडियासाठी खेळताना एकाच मोसमात जिंकलेल्या पाच अंतिम फेरी सामन्यांचाही समावेश आहे. त्यानंतर मग त्याला ‘न्यू यंग प्लेयर’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सुचवले गेले. या मोहिमेच्या माध्यमातून ‘पुणेरी पलटण’साठी प्रो कबड्डी लीगसाठी नवीन खेळाडूंची निवड केली जात होती. त्यात पीकेएलच्या सातव्या मोसमासाठी त्याची निवड झाली व तिथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला.

पंकज हा आज ‘पुणेरी पलटण’साठी खेळणारा एक स्टार खेळाडू आहे. आपल्या आयुष्यात लहानपणापासून अनेक आव्हानांचा सामना करत तो आज एक महत्वाचा कबड्डी खेळाडू बनला आहे. तो एकूण ४२ सामने खेळला असून त्याच्या नावावर २१५ गुण जमा आहेत. प्रती सामना त्याच्या रेड गुणांची संख्या ४.७१ आणि त्याच्या नॉट आऊटची सरासरी आकर्षक ७७.३% एवढी आहे. त्याने ४२३ ॲटॅकिंग प्रोवेस स्टँड घेतले असून त्यातील ३७ टक्के रेड या यशस्वी आहेत. ५ सुपर रेड आणि ५ या दहावर असलेल्या रेड आहेत. बचावात्मक खेळताना पंकजने २ सुपर टॅकल्स नावावर चढविल्या असून १७ एकूण टॅकल गुण मिळविले आहेत. त्याचा टॅकल यशाची टक्केवारी ही ३१% आहे.

पंकज मोहितेने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व ज्युनीअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०१९ मध्ये केले आहे. त्याशिवाय त्या स्पर्धेत संघाने मिळविलेल्या कांस्य पदकामध्ये त्याचा वाटा सिंहाचा राहिला आहे. त्याशिवाय त्याने खेलो इंडिया गेम्स २०२०मध्येही सहभाग घेतला होता आणि त्यात त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले.