गर्भधारणा आणि प्रसूती काळातील गुंतागुंत अनेकदा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतते. या काळात बऱ्याच प्रकरणांत गर्भवती महिलेच्या अनेक आरोग्य तक्रारी समोर येतात आणि डॉक्टरांसमोर मोठं आव्हान उभं राहतं. गर्भातील बाळ आणि गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात. अनेकदा या प्रयत्नांना यश येतं तर अनेकदा हे प्रयत्न अपयशी ठरतात. असाच प्रकार मुंबईतील केईएम रुग्णालयात घडला आहे. गर्भवती महिलेला अचानक पक्षाघाताचा झटका आला. परंतु, या गुंतागुतींच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतही केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळ आणि बाळंतीणीचा जीव वाचवला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिम येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षीय गर्भवती महिलेला सकाळी अचानक जाणवलं की ती बेडवरून उठू शकत नाही. तिला एक शब्दही बोलता येत नव्हता. तिची ही अवस्था पाहून तिच्या पतीने तिला तत्काळ मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात दाखल केलं. पक्षघाताचा झटका आला तेव्हा महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. तिला रुग्णालयात दाखल करताच या जोडप्याला धक्का बसला. कारण या गर्भवती महिलेला पक्षाघाताचा झटका आला होता. पक्षघाताचा झटका जगभरातील अपंगत्व आणि मृत्यूचं प्रमुख कारण आहे. परंतु, गर्भवती महिलांना पक्षघाताचा झटका सामान्यपणे संभवत नाही. त्यामुळे हे प्रकरण दुर्मिळ होतं.

महिला गरोदर असल्याने पक्षाघातासाठी असलेले वैद्यकीय उपचार तिला करता येणार नव्हते. कारण त्यामुळे तिच्या गर्भावर परिणाम होऊ शकला असता. एवढंच नव्हे तर लग्नाच्या आठ वर्षांनंतर ती गर्भवती राहिली होती. त्यामुळे या उपचारामध्ये मोठा धोका होता.

हेही वाचा >> ‘मार्ड’चा संप मागे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय

गोल्डन अवर्समध्ये डॉक्टरांची शर्थ

न्युरोइंटरव्हेंशनल रेडिओलॉजीच्या प्रमुख डॉ. रश्मी सराफ आणि त्यांची टीम जुन्या तंत्रावर अवलंबून होती. महिलेच्या मेंदूतील मध्य सेरेब्रल धमनी उघडण्यासाठी त्यांनी एक सामान्य स्टेंट वापरला, जो सामान्यतः हृदयाच्या धमन्यांमध्ये वापरला जातो. आम्ही गोल्डन अवर्समध्ये रक्त प्रवाह सुरळीत आणि महिलेच्या अर्धांगवायू झालेल्या उजव्या बाजूचे कार्य पुनर्संचयित केले, असं डॉ. सराफ म्हणाले.

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ.संगीता रावत म्हणाल्या, स्ट्रोक कोणत्याही वयात येऊ शकतो. पण गर्भधारणेमुळे रक्त गोठण्याची शक्यता असते. सूजमुळे गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे रक्तसंचलन होत नाही. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. परंतु, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागाने योग्य रितीने काम केल्याने रुग्णाची प्रकृती सुधारली आहे.

३६ तासांत डॉक्टरांची कमाल

महिलेला रुग्णालयात दाखल केल्याच्या ३६ तासांत या महिलेची प्रसूती झाली. १६ जानेवारी रोजी तिने बाळाला जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे, अशा गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतही बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत.

२००९ सालीही झाली होती यशस्वी प्रसूती

पक्षघाताचा झटका आलेल्या गर्भवती महिलेला केईएमच्या टीमने वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे. २००९ मध्ये हे असंच घडलं होतं. पण त्यावेळीही आई आणि मुल सुखरुप होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant heart patient suffers stroke mumbais kem doctors use stent to save her baby sgk
First published on: 08-02-2024 at 15:19 IST