मुंबई : दक्षिण मुंबईमधील चाळ संस्कृती झपाट्याने अस्ताला जात असून टॉवर संस्कृत वेगाने रूजत आहे. मात्र नियोजनशुन्य पद्धतीने होत असलेल्या पुनर्विकासामुळे चाळींप्रमाणेच टॉवरही अस्ताव्यस्तपणे उभे राहात आहेत. नव्या टॉवर संस्कृतीमुळे भविष्यात अनेक समस्यांना आमंत्रण मिळण्याची चिन्हे असून येत्या काही वर्षात पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न डोके वर काढण्याची अधिक चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भागातील झोपडपट्टीवासियांसाठी हाती घेतलेल्या अनेक ‘झोपू’ योजना रखडल्या असून झोपडपट्टीवासियांचे डोळे नव्या इमारतीतील घराकडे लागले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेचेही तीनतेरा वाजले असून कामगार रुग्णालय, पोदार रुग्णालय आदींमधील रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला आहे.

हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

दक्षिण मुंबईतील चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मलबार हिल, ताडदेव, वरळी आदी परिसरात उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि झोपडपट्टीवासी अशी संमिश्र लोकवस्ती आहे. या परिसरात एकेकाळी चाळ संस्कृतीत रहिवासी एकोप्याने नांदत होते. कालौघात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आणि चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. मात्र आजही अनेक चाळी आपले अस्तित्व टिकवून आहेत. परंतु दुरुस्ती, डागडुजी अभावी चाळींची दूरवस्था होऊ लागली आहे. दुरुस्तीपलिकडे गेलेल्या चाळींचा पुनर्विकास गरजेचा बनला आहे. त्यामुळे चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मलबार हिल, ताडदेव, वरळी आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मात्र पुनर्विकासातील नियोजनाच्या अभावामुळे चाळींच्या जागी अस्ताव्यस्तपणे बहुमजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. नजिकच्या काळात या परिसरातील लोकसंख्येत वाढ होऊन त्याचा नागरी सुविधांवर ताण येण्याची भीती आतापासून व्यक्त होऊ लागली आहे.

दक्षिण मुंबईमधील बहुसंख्य भागात आजही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. भविष्यात रहिवाशांची संख्या वाढल्यानंतर पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणेचाही विस्तार आवश्यक आहे. भविष्यात या परिसरातील वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होऊन वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनतळांची पुरेशी सुविधा नसल्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एकूणच या भागातील रहिवासी असुविधांमुळे त्रस्त आहेत.

हेही वाचा – सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

मलबार हिल, नेपिअन्सी रोड परिसरातील समुद्रकिनाऱ्यालगत उच्चभ्रू वस्ती, चाळी आणि झोपडपट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे नियम शिथिल होऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल अशी येथील रहिवाशांना अपेक्षा होती. परंतु त्यांची अपेक्षापूर्ती होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या सर्व मंडळींचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहेत.

अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागलेल्या वरळी परिसरात अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे. वरळी कोळीवाडा कळीचा मुद्दा बनले आहे. समुद्रकिनाऱ्यालगत विस्तारलेल्या या कोळीवाड्याच्या विकासाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. मात्र सीआरझेडमुळे विकासाला गती मिळू शकलेली नाही. वरळी कोळीवाड्यातही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. बैठ्या घरांवर मजल्यांचे इमले चढले आहेत. मुळ घर मालक तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावर भाडेकरूंच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तूर्तास घर मालकांना भाडेकरूंकडून भाड्याच्या रुपात उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध झाले आहे. समुद्रकिनाऱ्यालगत भरणी घालून त्यावर झोपड्याही उभ्या राहिल्या आहेत. परंतु भविष्यात कोळीवाड्याच्या पुनर्विकासात हे भाडेकरू, तसेच अनधिकृत बांधकामे अडसर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

उपचारांसाठी फेरा

एकेकाळी कामगारांच्या आरोग्यासाठी वरळीत कामगार विमा रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयात सुरुवातीला कामगारांना चांगली आरोग्यसेवा मिळत होती. परंतु कालौघात सेवा ढेपाळत गेली आणि अनेक समस्यांनी रुग्णालय जर्जर झाले. तीच अवस्था वरळीतील पोदार रुग्णालयाची आहे. त्यामुळे या परिसरातील गरीब रुग्णांना वैद्याकीय उपचारासाठी दूरवरच्या सरकारी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South mumbai redevelopment plans stalled due to lack of planning mumbai print news ssb
First published on: 21-03-2024 at 14:40 IST