Premium

फुलांचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

दादरमधील मीनाताई ठाकरे फुल मंडईसाठी१ कॉम्‍पॅक्‍टर कायमस्‍वरूपी तैनात करणार

dadar flower market
फुलांचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

मुंबई: प्रभादेवी, दादर परिसरात फुलांचा कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याने येथे कायमस्‍वरूपी एक कचरा संकलन व वाहतूक करणारे वाहन (कॉम्‍पॅक्‍टर) तैनात केले आहे. कचरा अस्‍ताव्‍यस्‍तपणे टाकणाऱ्या फुल विक्रेत्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभादेवी, दादर रेल्‍वे स्‍थानकाबाहेरील मीनाताई ठाकरे फुल मंडई परिसरामध्ये अनेक व्‍यापारी, व्‍यावसायिक रस्‍त्‍यावरच कचरा टाकतात. याला प्रतिबंध करण्यासाठी बुधवारी घनकचरा विभागात मंडईतील व्‍यापारी, व्‍यावसायिकांची बैठक घेऊन स्‍वच्‍छ मुंबई, सुंदर मुंबई’ संदर्भात जनजागृती करण्यात आली. महापालिकेने संपूर्ण मुंबईत स्‍वच्‍छता मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी कचरा वर्गीकरणाबाबत महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. मात्र काही ठिकाणी रस्‍त्‍यावरच कचरा टाकत असल्‍याच्‍या नागरिकांच्‍या तक्रारी पालिकेकडे येत असतात. त्‍यात मीनाताई ठाकरे फुल मंडईबाहेर दररोज फुलांचा ढीग टाकला जात असल्‍याच्‍या तक्रारीचादेखील समावेश आहे.

हेही वाचा >>> मेट्रो १ मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; २७ सप्टेंबरला तब्बल इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास

या पार्श्‍वभूमीवर जी उत्‍तर विभागातील घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याच्‍या अधिका-यांनी मीनाताई ठाकरे फुल मंडईतील व्‍यापारी, व्‍यावसायिक यांची नुकतीच बैठक घेतली. या परिसरात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी १ वाहन येथे सतत उभे असते. तरी देखील मंडईतील अनेक व्‍यावसायिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने निवासी संकूल, घाऊक कचरा उत्पादक यांना स्वतःचा कचरा स्वतः विघटन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याच पद्धतीने फुल मंडईतील कच-याचे जागीच विघटन करण्याबाबत सूचित केले आहे.

हेही वाचा >>> रजनीश सेठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी

प्रत्येक व्‍यावसायिकाने आपल्‍या दुकानामध्‍ये १२० लिटर क्षमतेचे कचरा संकलन डबे (डस्‍ट बीन)  ठेवणे तसेच महानगरपालिकेच्या वाहनामध्ये हा कचरा गोळा करणे अनिवार्य आहे. एवढेच नव्‍हे तर फुलांच्या कच-यापासून अगरबत्ती बनविण्याचे कार्य करणा-या संस्‍थेकडे हा कचरा दररोज देणे अभिप्रेत आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे जी उत्तर विभागाच्‍या बाजार निरीक्षकांनी घनकचरा व्यवस्थापन खात्‍‍याच्‍या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. कचरा अस्‍ताव्‍यस्‍तपणे न टाकता महानगरपालिकेच्‍या कॉम्पॅक्टरमध्‍येच टाकावा, असे आवाहन करण्‍यात आले. त्याचे उल्‍लंघन केल्यास यापुढील काळात दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा घनकचरा विभागाच्या उप आयुक्त चंदा जाधव यांनी यावेळी दिला. नवरात्रोत्सवात या परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होत असते. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सवात दादर परिसर स्वच्छ दिसेल अशी अपेक्षा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Warning of action against traders who throw flower waste on the road mumbai print news ysh

First published on: 05-10-2023 at 12:42 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा