राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर राजकीय निर्णय घेणेही अवघड झाले आहे. भविष्यातही पाण्यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या वाटपासाठी ऊर्जा नियामक आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पाणी नियामक आयोगाची स्थापना करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे.
 राज्य सरकारने पाण्याचे समन्यायी वाटप होण्यासाठी राज्य पाणी आयोग स्थापन केला असून त्याच धर्तीवर केंद्रानेही आयोग स्थापन करावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात यंदा अनियमीत पाऊस झाल्याने काही भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीला की पिण्याला द्यायचे याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
मराठवाडा आणि नगरमध्ये याच प्रश्नावरून सध्या वाद सुरू असून त्यावर राजकीय निर्णय घेणेही अवघड झाले आहे. अशा  परिस्थितीत नियामक आयोगानेच पाणी वाटपाचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले.