निवडणूक जवळ येत असल्याने सक्रियता वाढली

नागपूर : महापालिका निवडणुकीला सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. शहरातील विविध प्रभागातील विकास कामांच्या नस्ती मंजूर करण्यासोबत त्यासाठी वरिष्ठांकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी  महिला नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीराजांची लगबग वाढली आहे.

महापालिकेत भाजपचे १०८ उमेदवार निवडून आले.  त्यात भाजपच्या महिला सदस्यांची संख्या ६०, काँग्रेसम १३, बसप ५ आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक असे ८० महिला सदस्य आहेत. गेल्या साडेचार वर्षांत प्रभागातील कुठलीही विकास कामे असो की महापालिकेत विकास कामाच्या फाईल मंजूर करणे असो महिला नगरसेविकेपेक्षा त्यांच्या पतीराजांचे वर्चस्व प्रभागात आणि महापालिकेत दिसून आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि पक्षाच्या बैठकी वगळता अनेक महिला सदस्य प्रभागातील विकास कामांसाठी पतींना पाठवून  कामे करून घेताना दिसून येतात. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि निधीची कमतरता बघता गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडून  अनेक सदस्यांच्या विकास कामांच्या फाईल मंजूर करण्यात आल्या नाहीत. अनेक महिला नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मंजूर होऊनही निधी मिळाला नाही.

आता निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी असताना आणि त्यात प्रभागातील नागरिकांची नाराजी बघता अनेक महिला नगरसेवकांनी आपापल्या प्रभागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. फाईल मंजूर करण्यासाठी मात्र त्या पतीराजांना पाठवत आहेत.

शिवाय प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याच्या निमित्ताने अनेक नगरसेविका पतीसोबत अधिकाऱ्यांच्या कक्षात दिसून येत आहेत. प्रभागात सुद्धा विकास कामाची माहिती ठेवणे, अधिकाऱ्यांना फोन करणे, प्रभागाचा आढावा घेणे ही कामे  नगरसेविकांचे पती करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिलांचे प्रभाग पुरुषांसाठी आरक्षित झाले तर पतीराज तयार असतील, असेच संकेत यातून मिळत आहेत.