माझ्या घरी बहिणीच्या सासरची मंडळी आली होती. त्यातल्या एकाने रात्री माझ्याशी गैरवर्तन केले. आईला सांगितले तर ती म्हणली चूप रहा. हा प्रकार एक दिवसाचा नाही  तर ते मुक्कामी असेपर्यंत माझ्यासोबत होत गेला. आईला प्रत्येकवेळी सांगितले, विनवणी केली, पण केवळ दुसऱ्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी तिने माझ्यावर अत्याचार होऊ दिला. माझ्यासोबत जे झाले ते झाले, कृपया तुम्ही तुमच्या मुलींसोबत असे वागू नका. मुलीची आई म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून तिची साथ द्या, अशी कळकळीची आर्जव ‘नसरी’ने केली. डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली. ती काही ठरवून बोलण्यासाठी आली नव्हती, पण इतरांच्या अनुभवाने तिला बोलते केले. तेव्हा इतरांपेक्षाही तिचा अनुभव उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणणारा होता.

प्रत्येक स्त्रीजवळ सांगण्यासाठी एक कहाणी आहे. ‘देसी मी टू’या खुल्या व्यासपीठावर तरुणी व स्त्रियांनी अनुभवलेल्या लैंगिक अत्याचाराचा जाहीर पंचनामा केला. युवक क्रांती दल, सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाच्यावतीने आयोजित भारतातील पहिलाच अनोखा प्रयोग होता. कारण महिलांच्या कपडय़ांच्या ‘बोलक्या’ प्रदर्शनात, ज्यात त्यांच्या लैंगिक अत्याचाराच्या सत्यकथा दडल्या होत्या. प्रत्येक कपडय़ातून सादर झालेल्या कथेतून समाजातील डॉक्टर, वकील, राजकारणी, शिक्षक एवढेच नव्हे तर मंदिरातल्या पुजाऱ्याचा बुरखा फाडण्यात आला होता.

‘मी टू’ ही विदेशातून सुरू झालेली चळवळ भारतात येऊन पोहोचली तेव्हा त्याची अक्षरश: खिल्ली उडवण्यात आली, पण नागपुरातील या पहिल्याच प्रयोगाने त्याचे गांभीर्य जाणवून दिले. कारण विसाव्या वर्षांतील रुचितासोबत तिच्या आजीनेही तिला आलेला अनुभव या व्यासपीठावरून मांडला. विशेष म्हणजे, अवघ्या २०-२५ तल्या मुलींनी ज्या पद्धतीने समोर येऊन धाडस दाखवले, त्याला सभागृहात उपस्थित प्रत्येकाने दाद दिली.

डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात डॉ. रश्मी पारसकर सोवनी, डॉ. स्वाती धर्माधिकारी, रुबिना पटेल, संदीप बर्वे होते.

* स्त्रीच्या गर्भातून जन्माला येणारा माणूस त्याच स्त्रीच्या देहाशी खेळतो. नजर त्याची वाईट असते आणि डोक्यावर पदर मात्र महिलेला घ्यायला लावतो.

-फरहीन

* बाजारात गेले तर मुलींच्या अवयवाला भाजीची आणि रेस्टारंटमध्ये गेले तर पदार्थाची नावे दिली जातात. – रुचिता

* अत्याचार तुमचे शरीर उद्ध्वस्त करू शकतो, दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करू नका, स्वत:च स्वत:साठी लढा   – स्नेहल, बायकर