बारा वर्षांपासून घराबाहेर पडू दिले नाही

नागपूर : घरकाम करण्यासाठी एका तरुणीला बारा वर्षांपासून घरात डांबून तिचा अमानवीय छळ केल्याचा धक्कादायक प्रकार जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्यांमुळे या तरुणीची सुटका झाली. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध मानवी तस्करी करून छळ करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रीतपालसिंग खनिजा आणि मधु प्रीतपालसिंग खनिजा रा. नागसेन सोसायटी, मानकापूर अशी आरोपींची नावे आहेत. प्रीतपालसिंग याचा कोराडी मार्गावर पेट्रोल पंप आहे. त्याची पत्नी मधुचे माहेर जबलरपूरचे असून तिने सरोज यादव (६०) रा. जबलपूर यांची मुलगी सीमा (२९) हिला घरकामासाठी नागपुरात आणले. २००५ पासून ती त्यांच्या घरात चोवीस तास काम करायची. काही दिवसांनी आरोपींनी सीमाला तिच्या नातेवाईकांसोबत बोलण्यास मनाई केली. घरात येणाऱ्या बाहेरच्या लोकांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. तिला घराबाहेर पडू देत नव्हते व महिन्याला केवळ एक हजार रुपये वेतन देऊन तिची बोळवण करीत होते.

गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी सीमाला कधी तिच्या आईशी भेटू दिले नाही. सीमाचा होणारा छळ दुसऱ्या मोलकरणीला सहन न झाल्याने तिने आपल्या भ्रमणध्वनीवरून रेल्वेत नोकरी करणाऱ्या आपल्या बहिणीशी संपर्क करवून दिला. त्यानंतर ही माहिती कुणाल यादव व सामाजिक कार्यकर्त्यां अश्विनी जिचकार यांना मिळाली. त्यांनी भरोसा सेलमधील अधिकाऱ्यांना माहिती देऊन मुलीची सुटका करवून घेतली.

पोलीस आयुक्तांमुळे गुन्हा दाखल

याप्रकरणी भरोसा सेलमधील अधिकारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. जिचकार यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी ताबडतोब जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तिजारे यांनी गुन्हा दाखल केला. आरोपी अद्यापही फरार आहेत.