लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत दाखल झालेल्या ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी पहाटे अहेरी तालुक्यातील कोलामार्का जंगल परिसरात ही चकमक उडाली. यात तेलंगणातील मंगी इंद्रावेल्ली आणि कुमरामभीम येथील नक्षल्यांच्या विभागीय सचिव सदस्य वर्गिश, सिरपूर-चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव मगटू, सदस्य कुरसंग राजू, कुडीमेट्टा व्यंकटेश हे चार नक्षलवादी ठार झाले. चौघांवर एकूण ३६ लाखांचे बक्षीस होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्चरोजी रात्रीच्या सुमारास तेलंगणातील नक्षल्यांच्या समितीचे काही सदस्य प्राणहिता नदी ओलांडून अहेरी तालुक्यात प्रवेश केला होता. गडचिरोली पोलिसांना कुणकुण लागताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियान प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतिष देशमुख यांच्या नेतृत्वात अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालयातील विशेष नक्षलविरोधी पथक सी ६० च्या जवानांना कोलामार्का जंगलातील छत्तीसगढ सीमेलगत असलेल्या टेकडी परिसरात अभियान राबविण्याची सूचना केली.

आणखी वाचा- गडकरी म्हणाले, “आम्ही संविधानाच्या विरोधात असतो तर दीक्षाभूमीचा…”

दरम्यान, आज मंगळवारी पहाटे चार वाजता नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सी ६० पथकाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमक थांबल्यानंतर परिसराची झडती घेतली असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून १ एके ४७, १ कार्बाइन आणि २ देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले. चार वरिष्ठ सदस्य ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.

या घटनेनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. -नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 naxalites killed in gadchiroli police achieve great success in the wake of lok sabha elections ssp 89 mrj