नागपूर : मेडिकलशी संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मेडिकलमधील एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडल्याचे पुढे आले. त्याने येथील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. खोलीचे दार तोडून विद्यार्थ्याला मेडिकलमधील मानसोपचार विभागाच्या वार्डात दाखल केले गेले.

चुलबूल (बदललेले नाव) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळात राजस्थानचा असून मेडिकलमधील एमबीबीएस द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. राजस्थानला असतानाही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तर नागपुरातील शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रवेश घेतल्यापासून येथील मानसोपचार विभागातील डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नोव्हेंबरपासून त्याने परस्पर उपचार थांबवला.

हेही वाचा – वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?

मुलावर उपचार सुरू असल्याने त्याचे वडीलही सुमारे वर्षभरापासून त्याच्यासोबत मेडिकलजवळच्या धर्मशाळेत रहात होते. येथे बुधवारी अचानक चुलबूलने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. त्याच्या वडिलांनी त्याला वारंवार दार उघडण्याचे आवाहन केल्यावरही तो कुणाचे ऐकत नव्हता. त्याच्या वडिलांनी तातडीने मेडिकलच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धर्मशाळेत धाव घेतली. पोलिसांनाही सूचना दिली गेली. पोलिसांच्या मदतीने खोलीचे दार तोडून विद्यार्थ्याला बाहेर काढले गेले. विद्यार्थी मानसिकदृष्ट्या संतापलेला असल्याने मेडिकल प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानही तेथे पाठवले होते. जवानांनी पकडून विद्यार्थ्याला रुग्णवाहिकेतून मेडिकलच्या मानसोपचार विभागात हलवले. येथे त्याला दाखल करण्यात आले.

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

सर्व विद्यार्थ्यांची मानसोपचार चाचणी करणार काय?

या घटनेमुळे मेडिकल प्रशासन येथील सगळ्या विद्यार्थ्यांची मानसोपचार चाचणीचा यापूर्वी घेतलेला प्रकल्प पुन्हा राबवणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.