अकोला : बारावीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरमध्ये बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भावाने पोलिसाचा गणवेश परिधान करून थेट परीक्षा केंद्र गाठल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पातूर येथे उघडकीस आला. पोलीस अधिकारीसमोर येताच त्या तोतया पोलिसाचे बिंग फुटले. याप्रकरणी आरोपी भावावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपम मदन खंडारे (२४, रा. पांगरा बंदी) असे आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेचा बुधवारी पहिलाच पेपर होता. दहावी व बारावीची मंडळाची परीक्षा अत्यंत अवघड समजली जाते. त्यामुळे परीक्षार्थी देखील तणावात असतात. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपाययोजना करून पथके तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील कॉपी करण्याचे अनेक गैरमार्ग शोधले जातात.

हेही वाचा – चूल, मूल अन् शिक्षणही; दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन आई परीक्षा केंद्रावर, महिला पोलिसाने तान्हुल्याला सांभाळले

हेही वाचा – चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…

पातूर येथील शाहबाबु हायस्कुल येथील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलिसाचा गणवेश परिधान करून गेला. बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर फिरत असताना पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह बंदोबस्तासाठी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच त्याची भंबेरी उडाली. पोलिसांच्या डोळ्यातही धूळफेक करण्याच्या दृष्टीने अनुपमने अधिकाऱ्यांना सॅल्युट केले. पोलिसांना त्याचा संशय आला. त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नावाची प्लेट चुकीची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली. त्याच्याजवळ इंग्रजी विषयाची कॉपी सापडली. या प्रकरणी भादंवि कलम ४१७, ४१९, १७०, १७१ आणि अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेत बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी पोलिसांची वेशभूषा धारण करून परीक्षा केंद्रावर जाणे युवकाला चांगलेच भोवले आहे.