गोंदिया : इतरांच्या वादात मध्यस्थी करणे किती महागात पडू शकते, हे देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयातील झालेल्या घटनेवरून देवरीकरांना अनुभवास आले. शाळा संस्थापक व शिक्षकाचा सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मध्यस्थी करून पुढाकार घेणार्‍या लिपीकाला जीव गमवावा लागला. वादात मध्यस्थी करणार्‍या लिपीकालाच शिक्षकाने जब्बर मारहाण  केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लिपीकाचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला. ही घटना गुरूवार १६ मे रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुकूंद बागडे (६०) रा. मुल्ला ता. देवरी असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे १५ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. दरम्यान संस्थेची सभा संपताच शिक्षक  हिरालाल खोब्रागडे (५२) यांनी आपल्या समस्या उपस्थित करून संस्थापक असलेले मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांना धारेवर धरले. यावरून संस्थापक मेश्राम आणि शिक्षक खोब्रागडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. पाहता पाहता शाब्दीक वाद विकोपाला गेला. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, असा आरोप करीत शिक्षक खोब्रागडे यांनी मुख्याध्यापकांवर हल्लाबोल केला. दरम्यान मुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला वाद अधिकच वाढत असल्याचे पाहून  मुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला. मात्र खोब्रागडे यांनी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून  मुकुंदलाच जबर मारहाण केली. या घटनेत मुकूंद बागडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुध्द  होवून पडला . बेशुध्द अवस्थेतच मुकुंद बागडे यांना प्रथम उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज गुरुवारी १६ मे रोजी पहाटे ३ वाजतादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी हिरालाल खोब्रागडे ला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.

हेही वाचा >>>Video: बिबट्याने झाडावर झेप घेतली अन्… पेंच व्याघ्र प्रकल्पात आक्रितच घडले

चांगुलपना नडला

मृतक मुकुंद बागडे  पंचशील विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय मक्काटोला येथे लिपिक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर समाजकार्यामध्ये पुढे राहून काँग्रेस या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळेच वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावेत या उद्देशाने मुकुंद बागडे नी मध्यस्थी केली मात्र त्यांचा चांगुलपणा नडला आणि जीव गमवावा लागला मृतकाची पत्नी कल्पना बागडे मुल्ला ग्रामपंचायत येते सरपंच पदावर कार्यरत आहेत. मृतकाची मुलगी थायलंड येते शिक्षण घेत आहे. मृतकाच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी तसेच आप्तपरिवार आहे. अचानक झालेल्या हत्येमुळे देवरी तालुकात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाळा, महाविद्यालय म्हटले तर, एका विद्यार्थ्याला ज्ञानदान, विद्यार्थ्यांचे भविष्य, समाज घडविण्याचे मंदिर असते. मात्र शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेली नेतागिरी फसवणूक लबाडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शिक्षक आणि शिक्षणावरही लोकांचा विश्वास जास्त काळ टिकेल काय? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.