अकोला : जिल्ह्यासाठी रविवार हा घातवार ठरला. वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.
जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समाेरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दोन दुचाकीवर चिमुकल्यांसह सहा जण प्रवास करीत होते. विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. त्यामध्ये दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील आसिक खान कुदरत खान (४५), बुशरा आसिक खान (०६), हरान आसिक खान (०५) यांचा मृत्यू झाला असून सायमा फातिमा (३५), महिम फतेमा (४ महिने) सर्व रा. खेल पंचगव्हाण हे जखमी झाले आहेत. दुसऱ्या दुचाकीवरील आकाश निंबोकर (४०) रा. हिवरखेड हेसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोल्यात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – ‘तुझे न्यूड फोटो पाठव…’, पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने…

दुसऱ्या अपघातात पातूर-अकोला मार्गावर चिखलगावजवळ रविवारी दुपारी १ वाजता एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. कुटार वाहून नेणारा ट्रक आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी उपचारादरम्यान चारचाकीतून प्रवास करणारे विशाल गुलाब तायडे यांचा मृत्यू झाला. सैनिक असलेले तायडे सुट्टीवर आले होते. ते आपल्या मावस भावासोबत चारचाकीतून जात असताना हा अपघात घडला.

अपघाताच्या तिसऱ्या घटनेत जेसीबीखाली आल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा शहरात घडली. शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. यावेळी जेसीबीने कार्य केले जात असताना एकाचा तोल गेला. त्यामुळे ते जेसीबीखाली आले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – विद्यापीठे, महाविद्यालयांच्या परीक्षा पद्धती बदलणार, तुमची परीक्षा कशी होणार वाचा

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विविध कारणांवरून रस्ते अपघाताची संख्या झपाट्याने वाढली. पोलीस विभागाकडील अपघातांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. अपघातांसाठी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेसह मानवी चुका देखील कारणीभूत ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील अपघाताची आकडेवारी लक्षात घेता एकूण ४५९ गंभीर रस्ते अपघात झाले आहेत.