लोकसत्ता टीम

वाशीम : महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेता गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरात रोड शो झाला. हिरो म्हटले की त्यांचा थाटबाट पाहून अनेकांना हेवा वाटतो. त्यांचे कपडे, चष्मा, बूट किती महागडे असतील, यावरून अनेकजण आपापल्या परीने अंदाज लावतात. अशाच काहीसा प्रकार वाशीममध्ये पहायला मिळाला. रोड शोदरम्यान गोविंदाची नजर रस्त्यावरील एका बूटच्या दुकानावर पडली. मग काय, गोविंदाने वाहनांचा ताफा थांबवून या दुकानातून एक बूट खरेदी केला. आता हा बूट कितीचा, यावरून शहरभर चर्चा रंगत आहेत.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला शहरातील सिव्हिल लाईन येथून सुरवात झाली.

आणखी वाचा-गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी

हा रोड शो बसस्थानकाजवळ येताच गोविंदाची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या जुनेद तेली यांच्या बुटाच्या दुकानावर पडली. त्याने वाहनांचा ताफा थांबवून दुकान गाठले आणि काळ्या रंगाचा बूट विकत घेतला. यावेळी त्या विक्रेत्याला बुटाची किंमत किती, असे विचारले असता तीनशे रुपये असल्याचे त्याने सांगितले. गोविंदाने पाचशे रुपये देऊन बूट खरेदी केला. ते ज्या गाडीत होते, रोड शो दरम्यान आपल्या कारचे सनरुफ उघडून खरेदी केलेला बूट त्याने सर्वांना दाखवला. यामुळे हा बूट किती महागाचा असेल यावरून शहरभर चर्चा रंगली आहे. एव्हढा मोठा माणूस रस्त्यावरील एका दुकानाला भेट देतो आणि केवळ तीनशे रुपयांचा बूट खरेदी करतो. गोविंदाने या दुकानाला वैभव मिळवून दिल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. आवडीला तोड नाही, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.