पोलिसांची नजर चुकवून अनेकांचे आता ‘एकला चलो रे’
शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यासाठी ‘मोक्का’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यशही आले आहे. आतापर्यंत अनेक गुंडांवर मोक्का लावण्यात आला. त्यामुळे कारागृहाबाहेर असलेले आणि एरवी टोळीने फिरणारे गुंड पोलिसांची नजर चुकवून एक-एकटे फिरत असल्याची माहिती आहे.
राज्यस्तरावर नागपूर शहराची ‘गुन्हे राजधानी’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती. शहराच्या गुन्हेगारीवर गेल्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. विरोधकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची नाचक्की होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पोलीस विभाग खडबडून जागा झाला. नागपुरातील गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. जानेवारी २०१६ ते आतापर्यंत दहा प्रकरणांमध्ये पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत पन्नासवर कुख्यात गुंडांना अडकवले.
अजय राऊतच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात कुख्यात राजू भद्रे आणि त्याच्या टोळीतील नितीन सुनील वाघमारे, आशीष वीरेंद्र नायडू, कार्तिक शिवरामकृष्णन तेवर, भरत उर्फ राहुल सुशील दुबे, दिवाकर कोत्तुलवार, आशिष कोत्तुलवार, खुशाल उर्फ जल्लाद उर्फ पहेलवान थूल, नितीन मोहन पाटील, भुल्लर टोळीचा म्होरक्या हरदीपसिंग उर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर, जुजारसिंग कश्मीरसिंग ढिल्लो आणि हरविंदरसिंग उर्फ पिंटु भुल्लर, तर ‘डॉन’ संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीचे गौतम भटकर, संजय फातोडे, आकाश बोरकर, विनोद मसराम, प्रकाश मानकर, शक्ती मनपिया, युवराज माथनकर, सचिन जयंता अडुळकर, विजय मारोतराव बोरकर आणि लोकेश कुलटकर यांच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आला. तर एका दरोडेखोर टोळीतील शेख सलमान शेख शकील, शेख शकील शेख सबीर, गुरुदयाला पंचम तांडेकर, प्रफुल्ल ताराचंद चौधरी, राजू उर्फ जवाई प्यारेलाल शेंडे, गुलरेज नासिर बक्ष व चैतन्य आष्टनकर अपहरण प्रकरणातील आरोपी प्रदीप ओमदास निनावे, इसाक इसराईल शेख, दुर्वास भगवान कोहाड, तय्युब समशेर शेख आणि प्रभाकर खोब्रागडे यांच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. यांच्यातील एक आरोपी फरारी आहे. तर बॉबी अनिल भनवार (२०, रा. मंगळवारी सदर) याच्या मारहाण प्रकरणात सदर पोलिसांनी कुख्यात सैय्यद फिरोज सैय्यद नूर, सैय्यद नौशाद सैय्यद कलीम, राजू बिलमोहन चौरसिया, राकेश उर्फ निक्की अशोक गेडाम आणि राजा खान उर्फ राजा अब्दुल गफार यांच्यावरही मोक्का लावला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रथमच दहशत निर्माण झाली आणि गुंड आता टोळीटोळीने फिरत नसल्याची माहिती आहे. संध्याकाळी दारूच्या गुत्त्यावर बसतानाही गुंड एकेकटेच असतात. गुंडांनी पोलिसांचा प्रचंड धसका घेतला असून सध्या वातावरण निवळण्याची वाट बघत असल्याची माहिती आहे.

सोनसाखळी चोरांमध्ये सोनारही
चोरांनी महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी पळविण्याऱ्यांनी शहरात धुमाकुळ घातला. त्यांच्याविरूद्धही पोलिसांनी मोहीम हाती घेतली. सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, दोन सोनसाखळी चोर आणि चोरीचे सोने घेणाऱ्या एका सोनारास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरूद्धही सीताबर्डी पोलिसांनी मोक्का लावला आहे.

काम स्वीकारण्यास नकार
क्रिकेट बुकींची वसुली करून देणे, विवादित भूखंड मार्गी लावण्याची अनेक कामे गुंडांकडे येतात मात्र, पोलिसांच्या दहशतीमुळे लाखो रुपये मिळूनही गुंड काम स्वीकारत नसल्याची माहिती आहे. उत्तर नागपुरातील काही महिन्यांपूर्वी मोक्कातून बाहेर आलेला गुंडाने काही दिवसांपूर्वी सध्या कोणतेही काम करण्यास नकार दिला, असे एका पार्टीला सांगितल्याची माहिती आहे.