Premium

नागपूर : वलनी कोळसा खाणीतून पुन्हा उत्खनन, काय आहे करार जाणून घ्या

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) अनेक वर्षांपासून बंद वलनी कोळसा खाणीतून पुन्हा उत्खनन सुरू केले जाणार आहे.

Valni coal mine
नागपूर : वलनी कोळसा खाणीतून पुन्हा उत्खनन, काय आहे करार जाणून घ्या (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) अनेक वर्षांपासून बंद वलनी कोळसा खाणीतून पुन्हा उत्खनन सुरू केले जाणार आहे. त्यासाठी वेकोलि आणि वेन्सार कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या दोघांमध्ये सोमवारी (११ सप्टेंबर) सामंजस्य करार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कोळसा खाणीतून पूर्वी मोठ्या प्रमाणात उत्खनन होत होते. कालांतराने साठा कमी झाल्यावर ही खाण परवडणारी नसल्याचे सांगत येथील उत्खनन बंद करण्यात आले. परंतु आता वेकोलिने वेन्सार कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडसोबत करार करून या खाणीतून पुन्हा उत्खननाचा निर्णय घेतला आहे. वेकोलिमधील एका कार्यक्रमात वेकोलिचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार आणि वेन्सार कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे संचालक वंशी कृष्णा यांच्यात हा करार झाला.

हेही वाचा – पोलीस ठाण्यातील महिला मदत कक्ष वाऱ्यावरच; केंद्राने जाहीर केलेला निधी मिळालाच नाही

करार २५ वर्षांच्या कालावधीसाठी, महसूल वाटणीच्या आधारावर झाला आहे. याप्रसंगी वेकोलिचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांनी ही खाण लवकरच देशाच्या कोळशाची गरज पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी वेकोलिचे संचालक तांत्रिक आणि कार्मिक जे. पी. द्विवेदी, संचालक तांत्रिक (नियोजन आणि प्रकल्प) ए. सी. सिंग, मुख्य दक्षता अधिकारी अजय मधुकर म्हेत्रे, वेन्सार कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे महाव्यवस्थापक रमेश राव, सल्लागार बी. पी. सिंग उपस्थित होते.

हेही वाचा – ‘वाघांची कहाणी’ उलगडण्याची संधी!; ‘कॉफी टेबल बुक’चे उद्या मुंबईत प्रकाशन

अपेक्षित उत्पादन होणार

वलनी कोळसा खाणीतून एकूण ६.०५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन केले जाईल. करारानुसार येथून प्रतिवर्षी ०.२५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन अपेक्षित आहे. वलनी भूमिगत खाण ही वेकोलिची पहिली खाण आहे. येथे खासगी कंपनीसोबत महसूल वाटपाच्या आधारे खाणकाम केले जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Re excavation from valni coal mine know what the contract is mnb 82 ssb

First published on: 12-09-2023 at 09:26 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा