नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो. परंतु, यावर्षीपासून मात्र संघाकडून तृतीय संघ शिक्षा वर्ग अशा नावाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग -२ असे नाव असणार आहे. उद्या शुक्रवारपासून रेशीमबाग परिसरात या वर्गाला सुरुवात होत असून देशभरातील स्वयंसेवक या वर्गात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. १९२७ मध्ये पहिल्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन मोहिते वाडा येथे करण्यात आले होते. चाळीस दिवसांच्या त्या वर्गात एकूण १७ शिक्षार्थीं होते. तेव्हापासून तृतीय संघ शिक्षा वर्ग म्हणून या वर्गाची ओळख होती. मात्र या वर्षीपासून वर्गाचे नाव बदलण्यात आले असून, त्याला कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे नाव देण्यात आले आहे. संघाच्या संघटनात्मक बांधणीत प्रशिक्षण वर्गांना फार महत्त्व आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात आयोजित हा वर्ग २५ दिवस चालणार आहे. १० जून या वर्गाचा समारोप होईल. उद्या सकाळी वर्गाचे औपचारिक उद्घाटन होऊन वर्गाला सुरुवात होणार आहे. या वर्गात पूर्वीच्या सर्व वर्गांचे प्रशिक्षण घेतलेले देशभरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. प्राथमिक शिक्षण वर्ग विविध प्रांतात होतात.
हेही वाचा…अपहरण करून एक कोटीच्या खंडणीचा डाव फसला, अकोल्यातील अपहृत व्यावसायिक सुखरुप परतले
मात्र तृतीय वर्ष वर्ग केवळ नागपुरातच आयोजित केला जातो. या वर्गानंतरच स्वयंसेवकांना संघाची जबाबदारी दिली जाते. या वर्षीपासून स्वयंसेवकांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वयंसेवकांना ज्या क्षेत्रात रस असेल, त्यानुसार प्रशिक्षण दिले जाईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह अखिल भारतीय अधिकारी या वर्गात सहभागी होतील. दरवर्षी या वर्गाला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी भेट देत असतात. भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आदी वरिष्ठ नेते भेट देत असतात. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा १ जूनला होणार आणि त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. वर्गाचा १० जूनला समारोप होणार असल्यामुळे त्यापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते वर्गाला भेट देणार का याकडे लक्ष लागले आहे. शिवाय वर्गादरम्यानच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने त्यानंतर वर्गाच्या समारोपाच्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.