वर्धा : काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते यांच्यावर काँग्रेसचा असलेला राग वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे. काँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना लगेचच राज्यसभेची खासदारकी मिळाली. या साठीच अट्टाहास केला होता का, असेही विचारले गेले. मात्र येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेगळीच निषेधाची कृती केली. ती आता चांगलीच चर्चेत आहे.

काँग्रेसनेच वर्धा लोकसभा मतदारसंघ लढावा, तो इतर मित्रपक्षांस सोडू नये, यासाठी ठराव घ्यावा म्हणून ही सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, ज्येष्ठ नेते डॉ. शिरीष गोडे, शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे,नितेश कराळे, स्वप्ना शेंडे, धर्मपाल ताकसांडे, अशोक सेलूकर, अर्चना भोमले तसेच अन्य नेते उपस्थित होते.

हेही वाचा… आज यशोदा जयंती! काय आहे महत्व, आख्यायिका…

यावेळी अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून गेले म्हणून त्यांचा निषेध करीत ते भाजपवासी झाले म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी सर्व नेते शिस्तीत उभे होते. तसेच शोक व्यक्त करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे म्हणाले की चव्हाण हेच नव्हे तर जे जे नेते काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले त्यांच्या प्रती काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझी यास संमती नव्हती. श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार झाला असला तरी त्याचा ठराव झालेला नाही. तर आगामी लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार असलेले नेते शैलेश अग्रवाल म्हणाले की ही काँग्रेसीची संस्कृती नाही. जे झाले ते दुर्भाग्यपूर्ण म्हणावे लागेल. हा प्रकार घडणे अनुचित म्हणावे लागेल, अशी भावना अन्य काही नेत्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा… नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी

सध्या वर्धा मतदारसंघ हा काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार म्हणून जोरदार चर्चा आहे. त्या पक्षाचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी दौरेही सूरू केले.

काँग्रेसकडे लढण्यास लायक उमेदवार नाही म्हणून ही जागा राष्ट्रवादीस देण्यात यावी, असा मित्र पक्षात प्रवाह आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मंत्री असलेले त्यांचे सहकारी हर्षवर्धन देशमुख यांना कामाला लावल्याने काँग्रेस पदाधिकारी अस्वस्थ झाले आहे. पक्षाला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. काँग्रेस तर्फे लढण्यास अनेक इच्छुक असतांना जागा कशाला सोडता, असे संतप्त सवाल केल्या जात आहे. त्यासाठीच ही सभा बोलावण्यात आली होती. मात्र त्यात मनात असलेला राग वेगळ्याच दिशेने प्रकट झाला. त्याची आता उलटसुलट चर्चा आहे.