वाशीम : हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात वादळी पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आज दुपारनंतर वादळी वारा व पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर सुसाट वादळी वारा सुटला. मंगरुळपीर, वाशीम व इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे वाशीम तालुक्यातील सुरळा, कळंबा महालीसह काही गावांत घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांची तसेच घरांच्या भिंतींची पडझड झाली. वाशीम शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीतील शेतमाल भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे इतर ठिकाणीदेखील नुकसान झाले.

हेही वाचा…बुलढाण्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; पावणेदोन लाखांवर ग्रामस्थांची टँकरवर भिस्त

वीज पुरवठा खंडित

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. कधी विजांचा कडकडाट तर कधी वादळी वारा, अशी स्थिती आहे. या दरम्यान अल्पसा पाऊस असो वा वादळ वारा, वीज पुरवठा खंडित केला जातो. काही गावांत तर एकदा वीज गेली की कधी येईल, याची कुठलीच शास्वती नसते. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.