अमरावती : वडिलांच्‍या नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करण्‍याबाबतचा आदेश काढून देण्‍यासाठी एका खासगी व्‍यक्‍तीमार्फत लाच मागणाऱ्या चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड – मुळीक (वय ४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

गीतांजली गरड यांनी तहसील कार्यालयात वावरणारा खाजगी व्‍यक्‍ती किरण दामोधर बेलसरे (२९, रा. शिरजगाव बंड) याच्‍यामार्फत तक्रारकर्त्‍याकडे पैशांची मागणी केली होती. त्‍यांनी लाच मागितल्‍याचे पडताळणीदरम्‍यान उघड झाले होते. दरम्‍यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने शुक्रवारी तहसीलदार गीतांजली गरड व किरण बेलसरे यांना तहसील कार्यालयातून अटक केली.

हेही वाचा >>> अकोल्यात सूर्य आग ओकतोय! तापमान ४५.८ अंशांवर, अंगाची लाहीलाही…

तक्रारदार यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी लाचलुचपत विभागाकडे तकार दिली होती. त्यांच्‍या वडिलांच्‍या नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करण्‍याबाबतचा आदेश काढून देण्‍यासाठी तहसील कार्यालयात वावरणारा किरण बेलसरे याने स्वतः साठी आणि तहसीलदार गीतांजली गरड यांच्‍यासाठी  २५ हजार रुपयांची लाच मागितल्‍याचे तक्रारीत म्‍हटले होते. या तक्रारीवरुन दिनांक २८ मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान,  किरण बेलसरे याने तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

हेही वाचा >>> शेकापचे नेते राहुल देशमुख यांना नागपुरात अटक; कार्यकर्ते रस्त्यावर…

गेल्‍या ८ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसीलदार गीतांजली गरड  यांनी किरण बेलसरे याला लाच स्‍वीकारण्‍यास प्रोत्साहन दिल्‍याचे निष्पन्न झाले असल्याने दोन्ही आरोपीविरुध्द चांदूर बाजार पोलीस ठाण्‍यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्‍यात आला असून दोघांनाही अटक करण्‍यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलींद बहाकर, पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक विजया पंधरे, चित्रा मेसरे, प्रमोद रायपुरे, युवराज राठोड, नीतेश राठोड, महेंद्र साखरे, पो.कॉ. उमेश भोपते, वेभव जायले आदींनी पार पाडली.