लोकसत्ता टीम

नागपूर : काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) स्थानिक नेते राहुल देशमुख यांना शुक्रवारी (२४ मे) अटक केली. त्यानंतर काटोल बंदची हाक देत कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला. माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनीही या प्रकरणात पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण करणारे पत्रक काढत काटोल परिसरात वाटले. पत्रकामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून राहुल देशमुख यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता अटक केली गेली. एका उच्चशिक्षित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात राहुल देशमुख यांनी शुक्रवारी संध्याकाळी इतर स्थानिक नेत्यांसोबत काटोलमध्ये कॅण्डल मार्चचे आयोजनही केले होते.

आणखी वाचा-लोकसभेच्या धामधुमीत झालेल्या शेतकरी आत्महत्या दुर्लक्षित!आत्मघाताची दुर्देवी मालिका कायम!

राहुल देशमुख यांची कृती सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडविणारी असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सकाळी सहा वाजता राहुल देशमुख यांना अटक केली. त्यानंतर काटोल पोलीस स्टेशनच्या समोर राहुल देशमुख यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी काटोल बंदची हाक देत जोरदार निदर्शने केली. काटोल पोलीस ठाणे परिसरात या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे बंदोबस्त वाढवला. दरम्यान घटनेची माहिती कळल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व काटोलचे आमदार अनिल देशमुख हे तातडीने काटोलमध्ये पोहोचले. त्यांनी प्रथम कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांतर ते पोलीस ठाण्यात पोहचले. येथे पोलीस अधीक्षकांसह इतरही अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी समर्थकांसह न्यायालय परिसर गाठले. येथे ते राहुल देशमुख यांना जामीन मिळेपर्यंत कार्यकर्त्यांसह थांबले.

आणखी वाचा-चंद्रपूर : २५ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त, कृषी विभाग व गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई

स्थानिक नागरिकांमध्ये उलट- सुलट चर्चेला उधान

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल देशमुख यांनी सत्तारुढ पक्ष व शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला होता. याप्रसंगी ते सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक त्यांना या प्रकरणात अडकवून अटक केल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांकडून केला जात होता. परंतु पोलिसांनी हे आरोप फेटाळले. ही कारवाई नियमानुसारच असल्याचा त्यांचा दावा होता.