वाशिम : जिल्ह्यात सोमवारी रात्री मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे अंतिम टप्यात असलेला गहू, हरभरा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. आधीच अडचणींचा डोंगर, त्यात गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार, शिवनी, वनोजा, पेडगाव परिसरात सोमवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. सध्या शेतात गहू, हरबरा, संत्रा फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर दगावले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी

हेही वाचा – वर्धा : ‘ते’ दोन पोलीस अंमलदार अखेर निलंबित, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत…

पशुपक्षांना फटका

मंगरूळपीर तालुक्यातील चकवा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे मंगरूळपीर-कारंजा महामार्गावर विद्युत तारा तुटून पडल्या तर काही ठिकाणी पशुपक्षीही दगावले.