नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यावर निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देताना त्याचे चिन्हही बाहाल केले. त्यामुळे दुसरा गट म्हणजे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोग कोणते चिन्ह देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.

वडेट्टीवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीत फूट पाडली. एका पक्षाची दोन शकले पडणे यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही. शरद पवार गटाला आयोगाने तुतारी हे बोध चिन्ह दिले आहे. तुतारी ही मंगलप्रसंगी वाजवली जाते व त्यासाठी ‘हाता’ची आवश्यकता असते.

हेही वाचा – छोटा पक्षही मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो याची जाणीव लवकरच भाजपला… – महादेव जानकर असे का म्हणाले?

वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपने राजकारणाचा दर्जा घालवला. सेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला. मी शिवसेनेत असताना अनेक वर्षे मनोहर जोशी यांच्यासोबत काम केले. पक्षात त्यांची भूमिका ही मुख्याध्यापकांची होती. ते एक कोमल स्वभावाचे नेते होते. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची निष्ठा होती.

हेही वाचा – रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

वडेट्टीवार यांनी भाजप नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांच्यावर टीका केली. देशमुख यांच्या रक्त्तातच बेईमानी आहे. त्यांनी आमच्यावर टीका करू नये. त्यांनी यापूर्वी अनेकदा काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. त्यांच्या वडिलांनीही अनेक पक्ष बदलले, मुलगाही तेच करतो आहे. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये व ते भाजपमध्ये होते. भाजपमध्ये गर्दी झाली आहे. या पक्षाचे नेते आमच्या संपर्कात आहे, असे ते म्हणाले.