अकोला : सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच पोलिसांचे नाव घेऊन तरुणाने मोबाईलवर धमकीचे फोन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांचे नाव घेऊन धमकी देण्याचा गंभीर प्रकार असून विधिमंडळात प्रकरण मांडणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांना घर व गाडीवर हल्ला करण्याच्या धमकीचा फोन २३ फेब्रुवारीला आला होता. धमकी देताना युवकाने आपल्याला तुमच्या घरावर आणि गाडीवर हल्ला करण्यासाठी १० हजार रुपये मिळाल्याचा दावा केल्याचे मिटकरींनी तक्रारीत म्हटले आहे. आमदार मिटकरी यांना नरेश राऊत नामक युवकाचे कॉल आले. हा कॉल करणारा युवक पोलीस बॉइज संघटनेचा पदाधिकारी असल्याचे कळते. या युवकाने मिटकरींना फोन केल्यानंतर एकेरी भाषेत अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने धमकी दिली. त्यानंतर आमदार मिटकरी यांनी युवकाचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. या प्रकरणी आमदार मिटकरींनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा…अकोल्यात भाजपची उमेदवारी कोणाला ?

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या कथित संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. याच कथित संभाषणामध्ये पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप त्या युवकाने धमकी देतांना आमदार मिटकरी यांच्यावर केला. धमकी प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खदान पोलिसांनी आपल्याला अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

हेही वाचा…‘राजेश टोपेंची अजित पवारांबरोबर गुप्त भेट, मार्च महिन्यात विध्वंस दिसेल’, अमोल मिटकरींचा दावा

अकोला पोलिसांकडून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला असभ्य व अपमानास्पद वागणूक मिळते. पोलिसांवर कुठलाही दबाव टाकला नाही. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना विनंती केली होती. आरोपी तरुणाने धमकी देतांना पोलिसांचे नाव घेतले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या नावावर आमदारांना धमकी दिली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आगामी अधिवेशनात प्रकरण विधिमंडळात देखील मांडणार आहे. – अमोल मिटकरी, आमदार