नंदुरबार – आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील असुविधांमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महिलेस जीव गमवावा लागला. मागील आठवड्यातील ही घटना उजेडात आली असून नादुरुस्त रुग्णवाहिकेतच प्रसुती झालेल्या या महिलेच्या मृत्यूने पुन्हा एकदा आदिवासी भागातील समस्या पुढे आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पिंपळखुटाजवळील बर्डीपाड्याची रहिवासी कविता राऊत ही आपण आई होऊ, या आनंदात होती. मागील आठवड्यात प्रसुतीच्या कळा सुरु झाल्यानंतर कविताच्या कुटुंबियांनी रात्री आठच्या सुमारास तिला जवळच्या पिपंळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतु, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने परिचारिकेने तपासणी करुन मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली. कविताला नेण्यात येत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच एका चढावावर बंद पडली. कविताची नादुरुस्त रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. बाळाला जन्म दिलानंतर कविताची प्रकृती खालावली. संबंधित ठिकाणी अर्ध्या तासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली. या गाडीतून कविताला मोलगीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे सांगण्यात आले. परंतु, जिल्हा रुग्णालय गाठण्याआधीच कविताचा मृत्यू झाला.

हेही वाचा – सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण

कविताच्या घरापासून आरोग्य केंद्रापर्यंतचा खराब रस्ता, आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, नादुरुस्त रुग्णवाहिका, हे सारे कविताच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे. विशेष म्हणजे पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाने दिलेल्या रुग्णवाहिकेचा दुरुस्ती खर्च मिळाला नसल्याने सहा महिन्यांपासून ती नादुरुस्त होवून धुळे येथे दुरुस्तीसाठी पडून आहे. त्याठिकाणी दिलेल्या पर्यायी रुग्णवाहिकेची अवस्थाही धड नाही. हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेचे सदस्य रतन पाडवी यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडला.

जिल्ह्यातील आरोग्याच्या अशाच समस्या आमदार आमश्या पाडवी यांनीही सभागृहात मांडल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी नंदुरबारमध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते नंदुरबारमध्ये काही दाखल होईनात आणि समस्यांना शासन दरबारी काही वाचा फुटेना, अशी स्थिती आहे.

हेही वाचा – पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस

या सर्व प्रकाराचा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सखोल तपास करण्यात येत असून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – रवींद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman gave birth in an ambulance in nandurbar district ssb