लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील सुधारणांमुळे सिमांकीत बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, बाजार तळ या अनुषंगाने आडते, हमाल, मापारी शेतकरी व इतर घटकांवर परिणाम होणार असल्याकडे लक्ष वेधत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपात जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कांद्यासह शेतमालाचे लिलाव पूर्णत: ठप्प झाले. या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल थंडावली. नाशिक बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या काही शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागले.

नाशिक, लासलगावसह जिल्ह्यातील एकूण १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवसभर बाजार समितीत कुठलेही व्यवहार झाले नाही. सर्व बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट होता. विधानसभेत दाखल विधेयकात कृषी उत्पन्न पणन कायद्यात सुधारणा सुचविल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम आडते, हमाल, मापारी, शेतकरी व इतर बाजार घटकांवर होणार असल्याचे संघाचे म्हणणे आहे. या विरोधात पुकारलेल्या संपात संघाने केलेल्या आवाहनानुसार बाजार समिती सहभागी झाल्याचे नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-खासगी रुग्णालयातील लाचखोर डॉक्टरांना पोलीस कोठडी, शासकीय योजनेत उपचार करून लाच घेतल्याचे प्रकरण

नाशिक, लासलगाव, पिंपळगावसह सर्व बाजार समित्यांमध्ये दैनंदिन लिलाव बंद राहिले. सर्व घटक सहभागी झाल्यामुळे आवारात सामसूम होती. या संपाची काही शेतकऱ्यांना कल्पना नव्हती. पेठ रस्त्यावरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात ते कांदा घेऊन आले होते. परंतु, प्रवेशद्वार बंद असल्याने त्यांना निघून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. काहींनी व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर कांद्याच्या गोण्या रचून ठेवल्या. लासलगाव बाजार समितीत तसे घडले नाही. शेतकरी संघटनांनी संपाबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे शेतकरी कांदा घेऊन आले नसल्याचे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

दैनंदिन उलाढाल कशी ?

नाशिक बाजार समिती ही भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी भाजीपाल्यासह धान्य, फळे व कांद्याचे लिलाव होतात. या बाजार समितीची दैनंदिन सात ते आठ कोटींची उलाढाल आहे. संपामुळे ही उलाढाल थंडावली. लासलगाव बाजारात सध्या दैनंदिन १५ हजार क्विंटलची आवक होते. या बाजार समितीत कांद्यासह अन्य कृषिमालाचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे तीन कोटींचे व्यवहार ठप्प झाले. सर्व बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती होती.