लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : थेट दिल्लीहून भाजपने नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सुचविल्याने आपली हक्काची जागा स्वत:कडे राखण्यात शिवसेना शिंदे गटाची दमछाक होत आहे. या जागेसाठी भाजप आणि राष्ट्र्रवादी आग्रही असले तरी जागा सेनेकडे राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिंकून येण्याची क्षमता या निकषावर निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील मुंबईत तळ ठोकून मोर्चेबांधणी करीत आहेत.

नाशिकच्या जागेवर प्रथम भाजपने दावा सांगितल्यानंतर अकस्मात राष्ट्रवादीचे नाव पुढे आले. दिल्लीतून भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने भुजबळ यांच्या उमेदवारीची सूचना केल्याने शिंदे गटाची अडचण झाल्याचे चित्र आहे. नाशिकच्या जागेवरून तिन्ही पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाने निर्माण झालेला पेच एक-दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, पक्षाचे सचिव भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत नाशिकच्या जागेबाबत अद्याप तसा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. शिंदे गटाने शब्द दिलेला नाही. मतदारसंघातील सर्वसाधारण कल शिवसेनेकडे आहे. निवडणूक जिंकण्याची क्षमता जोखली जाईल. त्या अनुषंगाने महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गोडसे यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम

शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊ चौधरी यांनी मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याचा दावा केला. नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु ठेवाव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

नाशिकची जागा मुळात शिवसेनेची आहे. भाजपला ती सेनेला देण्यास अडचण नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट नंतरचा विषय आहे. याकडे लक्ष वेधत पदाधिकारी ही जागा शिंदे गट राखू शकेल, अशी आशा बाळगून आहेत. दरम्यान, गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंगळवारी मुंबईत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील याच दिवशी मुंबईत दाखल झाले. या जागेसाठी आपण आग्रही नाही. परंतु, पक्षाने आदेश दिला तर, ती राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविली जाईल, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.