जळगाव – भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, जीएसटीच्या माध्यमातून जनतेच्या खिशातील पैसा लुटला जात आहे. भाजपने दहा वर्षांपूर्वी दिलेला शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्दही पाळला नाही. उलट शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले असून, उत्पन्न निम्मे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारपासून जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे दुपारी जाहीर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, भाजपचा चारशेपारचा नारा आता बंद झाला असून, दोनशेपार होईल की नाही, याची भीती त्यांच्या मनात असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांविरोधात असून, जीएसटीच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून पैसा काढला जात आहे. भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट केले आणि उत्पन्न निम्मे केले. त्यामुळे आता शेतकरी भाजपविरोधात गेले आहेत, असा दावाही पाटील यांनी केला.

हेही वाचा – वंचितचेही शक्तिप्रदर्शन; करण गायकर, मालती थवील यांचे अर्ज दाखल

चपलेपासून टोपीपर्यंत सर्व वस्तूंना १२ ते १८ टक्के जीएसटी वसूल केला जातो. शेततळ्यासाठी प्लास्टिक कागद खरेदीसाठी १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो. घर चालविण्यासाठी ५० हजार रुपये खर्च केले, तर त्यातील नऊ हजार रुपये हे जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत जातात, असा हिशेबही जयंत पाटील यांनी दिला. भाजपने मराठी माणसांचे दोन पक्ष फोडले. पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, अशी टीकाही केली.

हेही वाचा – नाशिकमध्ये पाच गावठी बंदुकांसह १८ कोयते, तलवारी जप्त

काँग्रेसच्या पदाधिकारी प्रतिभा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी खालच्या स्तरावर होत असलेल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संविधान आर्मीचे अध्यक्ष जगन सोनवणे आदींनी भाजपवर टीकास्त्र सोडले.