लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना जाहीर सभांचा धडाका उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार या बड्या नेत्यांच्या सभा बुधवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत.

महायुतीतर्फे नाशिक लोकसभेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर, दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे मैदानात आहेत. सर्वच पक्षांनी मेळावे, संवाद, सभांच्या माध्यमातून प्रचाराला वेग दिला आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट-ठाकरे गटात अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. महायुतीत या जागेवरून बराच घोळ झाला. उमेदवार निश्चितीनंतरही धुसफूस होती. कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरावे लागले. नाशिक दौरा करुन त्यांनी प्रचारावर लक्ष ठेवले. रविवारी सायंकाळी पुन्हा मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले. रात्री उद्योजकांसमवेत बैठकीचे नियोजन आहे.

आणखी वाचा-काँग्रेसचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे भाजपमध्ये

बुधवारी तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा वेगवेगळ्या भागात होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दुपारी एक वाजता कांद्याचे लिलाव होणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता नाशिक शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तर, सायंकाळी सहा वाजता शरद पवार यांची जाहीर सभा वणी येथे होणार आहे. पवार यांची दुसरी सभा गुरुवारी सायंकाळी मनमाड येथे होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी भाजपचे नेते नितीन गडकरी यांची गोदावरी काठावर सभा होईल.

महाविकास आघाडीच्या सभांना प्रारंभ झाला आहे. शनिवारी रात्री खासदार संजय राऊत यांच्या दोन चौक सभा शहरात झाल्या. यातील एक सभा भर पावसात चौक मंडई येथे पार पडली. रविवारी सायंकाळी देवळाली कॅम्प येथे सुषमा अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, इम्रान प्रतापगढी यांची चौक मंडई येथे सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा १८ तारखेला नाशिक आणि इगतपुरी येथे होणार आहे.