लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मंदिरांचे शहर अशी ओळख असलेले नाशिक शहर वेगवेगळ्या प्रथा, परंपरांसाठीही ओळखले जाते. धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी निघणारी दाजिबा वीर मिरवणूक असो किंवा रंगपंचमीची आगळीवेगळी मजा. नाशिकने एक वेगळीच ओळख तयार केली आहे.

शनिवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात रंगपंचमीचा उत्साह दुपारपासून दिसून आला. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही पाठीवर पाण्याची पिशवी ठेवून हातात बंदुकीसारख्या असणाऱ्या पिचकारीला अधिक मागणी दिसून आली. शहरात दरवर्षी पेशवेकालीन पाच रहाडींमध्ये रंगपंचमीच्या दिवशी डुंबण्यासाठी चढाओढ सुरु असते. यंदा त्यात मधली होळी भागातील एका रहाडीची भर पडल्याने शनिवारी सहा रहाडींमध्ये नाशिककरांनी डुंबण्याचा आनंद घेतला. या रहाडी नैसर्गिक रंगमिश्रीत पाण्याने भरण्यात आल्या. त्यानंतर रितसर पूजा करुन त्या डुंबण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. युवावर्गासह ज्येष्ठांनीही रहाडींमध्ये डुंबण्याचा आनंद घेतला. अनेक ठिकाणी वर्षा नृत्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. रंग खेळल्यानंतर नाशिककरांनी आंघोळीसाठी रामकुंड परिसरात धाव घेतली.

आणखी वाचा-नाशिकमध्ये उमेदवारीची वाट न पहाता प्रचाराचा थाट, हेमंत गोडसे यांच्यावर अनधिकृत प्रचाराचा आक्षेप

येवल्यात पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या रंगांचे सामने दुपारनंतर ऐन बहरात आले. हे सामने पाहण्यासाठी दूरवरुन पर्यटकही आले. रसायनयुक्त रंग त्वचेसाठी घातक असल्याने काही वर्षांपासून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक रंग वापरण्याबाबत विविध सामाजिक संस्थांकडून जागृती केली जात आहे. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत असून पर्यावरणपूरक रंगांची मागणी वाढल्याचे दिसून आले.