नाशिक – अयोध्येत होणारे राम मंदिर हा सर्व हिंदूचा श्रद्धेचा विषय आहे. या मंदिरासाठी माझ्या वडिलांनी लाठ्या खाल्ल्या आहेत. भाजपकडून मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास एखाद्या सोहळ्यासारखे स्वरूप दिले गेले असून ते चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले. सक्तवसुली संचनालयाकडून विरोधी पक्षातील नेत्यांना बजावल्या जाणाऱ्या नोटीस हा भाजपच्या दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर खडसे सध्या राज्य दौऱ्यावर आहेत. शनिवारी नाशिक येथे त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र खडसे यांच्या हस्ते देण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना खडसे यांनी विविध मुद्यांकडे लक्ष वेधले.

हेही वाचा – Ram Mandir In Maharastra : राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध राम मंदिराला द्या भेट, ‘या’ खास जागेचा रामायणात आहे उल्लेख

अयोध्येत मंदिर अपूर्ण असताना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून हे चुकीचे आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून ही गर्दी कमी झाल्यानंतर नक्की दर्शनाला जाईल, असे खडसे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीशी युतीविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. बैठकीत निर्णय होईल. यानंतर चित्र स्पष्ट होईल. सध्या सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस बजावल्या जात आहेत. हे दबावतंत्र आहे. भाजप ज्यांच्या विरोधात बोलतो, त्याला ईडीची नोटीस बजावली जाते. मग ती व्यक्ती भाजपमध्ये गेली की शुद्ध होऊन जाते, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – पोलीस बंदोबस्तात संसरीत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या निकालावरून राष्ट्रवादी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर त्यांनी शरद पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला. नेते सोडून गेले, पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथेच आहे. शासन आपल्या दारीसाठी शासनाला गर्दी जमवावी लागते. पण शरद पवार यांच्या सभेला उत्स्फुर्त गर्दी होते. यातच पवार यांचे यश आहे. सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा, मुस्लिम, धनगर, इतर मागासवर्गीय घटकाला झुलवत ठेवत आहे. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असे खडसे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What rohini khadse claim about her father eknath khadse regarding ram temple ssb