संतोष जाधव

गतवर्षी सप्टेंबरमध्ये पाहिलेली सर्वोच्च रुग्णसंख्याही गौण वाटावी, अशी परिस्थिती नवी मुंबईत निर्माण झाली असून फेब्रुवारीपासून रुग्णवाढीच्या चढत्या आलेखामुळे सध्या शहरात ११ हजार ६०५ इतके रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका प्रशासन खाटांच्या संख्येत वाढ करत असताना दुसरीकडे रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

नवी मुंबईत सध्या दररोज एक हजाराहून अधिक करोनाबाधितांची नोंद होत असून विषाणूचा झपाट्याने प्रसार होऊ लागला आहे. लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांमुळे २० ते २५ जण बाधित होत असल्याने करोनाबाधितांची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे.  यामध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी रुग्णालयातील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. उपचाराधीन रुग्ण मागील ३ आठवड्यात जवळजवळ तीनपटीपेक्षा जास्त वाढले आहेत.

करोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये २० ते ४० वयोगटांतील नागरिकांना अधिक प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र आहे. करोनामुक्तीचा दर हा ९६ टक्क्यांवरून पुन्हा खाली आला आहे.

शहरातील उपचाराधीन रुग्ण …

* २३ जून-  ४

*  २३ जुलै- ३९८६

* २३ ऑगस्ट-   ३४४९

* २३ सप्टेंबर-   ३५८५

* २३ ऑक्टोंबर- २५४८

* २० नोव्हेंबर-  १२६६

* २०डिसेंबर- १०१४

* २० जानेवारी-  ८४५

* २० फेब्रुवारी-  १०१८

* २४ मार्च- ३६३७

*  १२ एप्रिल-   ११६०५

नवी मुंबईत मागील काही आठवड्यात नवे रुग्णांची संख्या तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या पटीत वाढली आहे. पालिका प्रशासन सर्व प्रकारच्या खाटा वाढवत असून नागरीकांनीही पालिकेला करोना नियमावली पाळून पालिकेला सहकार्य करावे. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पालिका या खाटांची संख्याही वाढवत आहे. खाटांची स्थिती दर्शवणारे पोर्टलही वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहे.

– अभिजीत बांगर, पालिका आयुक्त