नवी मुंबई : तीन टाकी प्रवेशद्वारासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हॉल्व दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे रस्ता, पदपथ सर्वच ठिकाणी मातीचे ढिगारे उभे राहिल्याने पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही, तर दुसरीकडे मुख्य चौकापासून पंधरा-वीस फुटांवर ही दुरुस्ती होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुरुस्ती करताना माती टाकण्यासाठी जागा असताना रस्ता आणि पदपथावर माती टाकल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरखैरणेत सर्वाधिक पाणीपुरवठा तीन टाकी, सेक्टर १७ येथून केला जातो. त्यामुळे या तीन टाक्या जेथे आहेत त्या परिसराला तीन टाकी असे नाव पडले आहे. याच तीन टाकी पाणीपुरवठा कार्यालयास दोन प्रवेशद्वारे असून त्यापैकी एका प्रवेशद्वाराच्या बाहेरील भूमिगत व्हॉल्व दुरुस्तीचे काम आठ दिवसांपासून केले जात आहे. यासाठी दोन मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या व्हॉल्वमधून कायम गळती होत असते. वर्षातून किमान दोन-चार वेळा त्याची दुरुस्ती केली जाते.

हेही वाचा…पनवेल : आयुक्तांअभावी महापालिकेचा कारभार रामभरोसे 

एखाद्या ठिकाणची अशा प्रकारे वर्षातून किमान दोन-तीन वेळा दुरुस्ती केली जात असली तरी पाणीगळती कायम अशी स्थिती कदाचित फक्त याच ठिकाणी होते. या वेळी मात्र मोठ्या प्रमाणात दुरुस्ती काढल्याचे चित्र दिसत असून निदान आता तरी कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी अशी आशा व्यक्त केली जात आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीयीकृत बँक, हॉटेल्स, बेकरी, फर्निचर अशा सर्वच प्रकारच्या आस्थापना असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यात हा रस्ताही कमी पडतो. मात्र व्हॉल्व दुरुस्ती करताना कंत्राटदार किंवा मनपाच्या संबंधित विभागाला याचे काहीही गांभीर्य नाही असे दिसून येत आहे. कारण व्हॉल्व दुरुस्ती करताना अर्ध्या रस्त्यात मातीचे ढिगारे आहेतच, शिवाय पदपथावरही मातीचे ढिगारे एवढे टाकण्यात आलेत की चालता येणे शक्य नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा…पनवेल: आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल

अशा प्रकारच्या दुरुस्तीवेळी नागरिकांची गैरसोय होते. पण सर्वच जण सहकार्य म्हणून सहनही करतात. मात्र या ठिकाणी चार पावले लांब म्हणजे प्रवेशद्वाराच्या आत जर खणलेली माती टाकली असती तर पादचाऱ्यांना सहज पदपथाचा वापर करणे शक्य झाले असते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली नसती, अशी प्रतिक्रिया या परिसरातील रहिवासी संदीप राजपूत यांनी दिली.याबाबत कोपरखैरणे विभाग कार्यालयातील संबंधित विभागाला विचारणा केली असता योग्य ती पावले उचलण्यात येतील असे उत्तर देण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai valve repair causes traffic congestion footpath close pedestrian woes in kopar khairane s teen taki area psg
Show comments