मॉल, चित्रपट व नाटय़गृहे बंद; अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंतच खुली

नवी मुंबई : शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी झाल्याने शहरातील करोना निर्बंध उठविण्यात आले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने करोना रुग्णवाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या शंभरपेक्षा अधिक झाली असून गुरुवारी शहरात १३७ रुग्ण सापडले होते. तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही १,३६९ पर्यंत गेली आहे. त्यात डेल्टा प्लसच्या संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेने शहरात पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी उशिरापर्यंत नियमावली तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र सोमवारपासून हे निर्बंध लागू होतील. यात मॉल, चित्रपट व नाटय़गृहे बंद राहणार असून दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

गेल्या आठवडाभरापासून दोन अंकी असलेली दैनंदिन रुग्णसंख्या तीन अंकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड हजारांच्या वर गेली आहे. गुरुवारी शहरात १३७ करोना रुग्ण सापडले तर उपचाराधीन रुग्ण हे १,३६९ पर्यंत आहेत. ही रुग्णवाढ राज्यातही सुरू असल्याने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना परिस्थितीनुसार निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सोमवारपासून हे निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील नियमावलीनुसार कडक निर्बंध लागणार आहेत. नियामवलीत बदल होणार असून मॉल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे बंद होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच इतर दुकानांमध्येही बदल केले जाणार आहेत.

नवे निर्बंध असे

’ मॉल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, व्यायामशाळा, उद्याने बंद.

’ अत्यावश्यक सेवेतील

दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंतच खुली.

’ इतर दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंतच खुली तर शनिवार व रविवारी पूर्णवेळ बंद.

’ खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती.

१३० नवे रुग्ण

नवी मुंबई शहरात शुक्रवारी १३० नवे रुग्ण आढळले असून करोनाबधितांची एकूण संख्या १,००,१०९ झाली आहे. शुक्रवारी करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict restrictions again monday malls theatre ssh
Show comments