काँग्रेस आणि समाजवादी पक्षांत झालेल्या जागावाटपावरील सहमतीनंतर अखेर अखिलेश यादव आग्रा येथे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीदेखील यावेळी उपस्थित होत्या. या यात्रेदरम्यान बोलताना अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून अखिलेश यादव हे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता होती. ही यात्रा उत्तर प्रदेशात दाखल होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी या यात्रेत सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी या यात्रेसाठी काँग्रेसला शुभेच्छाही दिल्या. मात्र, ज्यावेळी ही यात्रा प्रत्यक्षात दाखल झाली, त्यावेळी काँग्रेस जोपर्यंत जागावाटपाबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणार नाही, असा पवित्रा अखिलेश यादव यांनी घेतला. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आणखी वाढतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

हेही वाचा – पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी

प्रियांका गांधींनी केले अखिलेश यादव यांचे स्वागत

अखेर शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) जागावाटपाच्या चर्चेवर या दोन्ही पक्षांत सहमती झाली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेत सहभाग नोंदवला. रविवारी अखिलेश यादव या यात्रेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर यात्रेमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र सेल्फी घेतले. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गाधी आणि अखिलेश यादव अशा तिघांनीही यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

अखिलेश यादव यांची मोदी सरकावर टीका

यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “आगामी काही दिवसांत आपल्यापुढे लोकशाही वाचवण्याचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. आज मला भाजपा हटवा, देश वाचवा, संकट मिटवा हा एकच संदेश द्यायचा आहे”, असे ते म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपाचा पराभव करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राहुल गांधी यांनीही यावेळी बोलताना इंडिया आघाडी ही गरिबांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदेशीर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भारत जोडो न्याय यात्रेला नागरिकांचा पाठिंबा

राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतल्याचं बघायला मिळालं. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांचे एकत्र येणे म्हणजे आगामी निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या जागावाटपावरील अंतिम निर्णयानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष ६३, तर काँग्रेस १७ जागा लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे या यात्रेदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही नागरिकांनी यावेळी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. ”आम्ही खरेदी करण्यासाठी या भागात आलो होतो. मात्र, गर्दीमुळे आम्हाला इथून निघता आले नाही, त्यामुळे आम्ही अखिलेश यादव यांचे भाषण ऐकण्यासाठी इथे थांबलो. अखिलेश यादव हे उच्च शिक्षित राजकीय नेते आहेत. आमचा पूर्ण परिवार समाजवादी पक्षाला मतदान करतो. त्यांनी तरुणांसाठी बरंच काम केलं. मात्र, आता तरुणांना रोजगारदेखील मिळत नाही”, अशी प्रतिक्रिया बीएच्या तिसऱ्या वर्गाला शिकणाऱ्या राणी नावाच्या विद्यार्थिनीने दिली.

हेही वाचा – दिल्लीत तळ ठोकून बसलेले झारखंड काँग्रेसचे आठ आमदार परतले, राजकीय समीकरण बदलणार?

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या २४ वर्षीय नहीम अली या तरुणानेही यावेळी बोलताना, उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली. ”मी गेल्या दोन वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करत आहे. यावेळी मी परीक्षाही दिली. मात्र, या भरतीचा पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द करण्यात आली. असे होत राहिले तर तरुणांना रोजगार कसा मिळेल”, असे तो म्हणाला. तसेच इंडिया आघाडीकडून अपेक्षा असल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav joins rahul gandhi bharat jodo nyay yatra try to show strength in uttar pradesh spb