Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये एक प्रश्न सतत कानावर पडत आहे आणि तो म्हणजे यंदा हवा कोणाची? फेब्रुवारी २०२२ च्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वांचे उत्तर असायचे आप. २०२२ निवडणुकीत आपने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळविला होता. यंदा मात्र, अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोणी म्हणतंय यंदा मोदींची हवा आहे, कोणी म्हणतंय याविषयी आम्हाला काही माहीत नाही, तर काही मतदार भाजपावर भडकल्याचे चित्र आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे अनेकांना उमेदवार कोण आहे हेदेखील माहीत नाही.

१९९६ नंतर पहिल्यांदाच भाजपा एकटा उभा

१९९६ नंतर पहिल्यांदाच भाजपा सुखबीर बादल यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीचा मित्र शिरोमणी अकाली दल (एसएडी)शिवाय निवडणूक लढवीत आहे. शेतकरी संघटना भाजपावर आक्रमक असूनसुद्धा आपण दुप्पट मतांनी निवडून येऊ, अशी भाजपाला आशा आहे. गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील १३ जागांपैकी भाजपा केवळ तीन जागांवर लढत आला आहे. होशियारपूरमधून भाजपाने गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे; गुरुदासपूरमध्ये भाजपाने १९९८ पासून पाच वेळा विजय मिळविला आहे; तर अमृतसरमध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा : सर्वच पक्षांविरोधात गावकर्‍यांमध्ये रोष? डझनभर गावांनी टाकला निवडणुकीवर बहिष्कार; कारण काय?

शिरोमणी अकाली दल आणि भाजपामध्ये फूट

उर्वरित १० जागा पारंपरिकपणे लढविल्या होत्या; जो भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष होता. आता रद्द केलेल्या तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे २०२० मध्ये एसएडीने भाजपाशी संबंध तोडले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी निवडणूक आयोगाकडे (EC) त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचाराचा अधिकार नाकारल्याबद्दल तक्रार केली आहे. ते म्हणतात की, ही निवडणूक २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची पायरी आहे. “यावेळी पक्ष आपल्या मतांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करील आणि २०२७ च्या निवडणुकीत सरकार स्थापन करेल,” असा दावा त्यांनी केला.

लुधियाना, भटिंडा, संगरूर व पटियाला या मतदारसंघांतील मतदारांचा कल भाजपाकडे दिसला. भटिंडा येथील एका पुरुषांच्या गटाने भाजपाला पाठिंबा दिला. “मोदीसाहेबांनी देशासाठी चमत्कार केले आहेत. आज जग आपला आदर करते,” असे व्यापारी भरत जिंदाल म्हणाले. ते पुढे म्हणाले, “हरजिंदरसिंग मेला यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या दुकानाबाहेर दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती; पण मारेकरी अजूनही फरारी आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आम्हाला मोदीजींची गरज आहे.”

अयोध्येतील राम मंदिरामुळे भाजपाला फायदा

व्यापाऱ्यांनी अमृतपाल सिंहचादेखील उल्लेख केला. अमृतपाल सिंह राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) आसाममध्ये तुरुंगात असूनही खडूरसाहिब मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. सध्या वातावरण खूप खराब आहे, असे ते म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरानेही भाजपाच्या लोकप्रियतेत काही प्रमाणात हातभार लावला आहे. बर्नाळा-सिरसा मार्गावरील जेसीबी स्पेअर पार्ट्सचे डीलर मानव गोयल म्हणतात, “मला माहीत आहे की, ज्यांनी भाजपाला कधीही मत दिले नाही, ते आज केवळ मंदिरामुळेच भाजपाला मतदान करण्याचा विचार करतात.“

मंदिराच्या मुद्द्यावरून स्थलांतरित मतेही त्यांच्या बाजूने होतील, अशी आशा भाजपाच्या उमेदवारांना आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याच्या लोकसंख्येच्या ३८.१५ टक्के हिंदू आहेत आणि मोठ्या संख्येने स्थलांतरित हिंदू हार्टलँड राज्यांमधून पंजाबमध्ये येत असल्याने, ही संख्या आता वाढल्याचा अंदाज आहे. पंजाब हे शीख बहुसांख्यिक राज्य असून, पंजाबमधील लोकसंख्येच्या ५७ टक्के संख्या शीख समुदायाची आहे.

पंजाबमध्ये धर्माच्या आधारे मतदान नाही

“पंजाब धर्माच्या आधारे मतदान करीत नाही आणि पंजाबी हिंदूंनी असे कधीच केलेले नाही,” असे इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अॅण्ड कम्युनिकेशन या थिंक टँकचे संस्थापक प्रमोद कुमार म्हणतात. अमृतसर येथील प्रख्यात समाजशास्त्रज्ञ म्हणतात की, शिखांसाठी १९२० मध्ये एक पक्ष म्हणून स्थापन केलेल्या शिरोमणी अकाली दलाला, जर शिखांनी धार्मिक आधारावर मतदान केले असते, तर ते कधीही सत्तेतून बाहेर गेले नसते.

पंजाबमधील एक व्यापारी राज वर्मा मंदिरावर टीका करतात, “मोदी रामजींवर दावा का करीत आहेत? भाजपा आमच्यासाठी खूप कट्टर पक्ष आहे आणि आम्ही विविधतेचा आदर करतो. जोपर्यंत त्यांची (भाजपा आणि एसएडी) युती होती, तोपर्यंत ते जिंकू शकत होते; परंतु यापुढे नाही,” असे ते म्हणतात.

“आम्हाला शांतता हवी; धार्मिक फूट नको.”

अमृतसरच्या बाहेरील आरबी इस्टेटमध्ये राहणारे हिंदू व्यापारी पी. कपूर म्हणतात, “आम्हाला विकास हवा आहे; धर्म नाही. मी एक हिंदू खत्री आहे. पण, येथील बहुतांश व्यापाऱ्यांप्रमाणे मी शीदान दा गुरुद्वाराला भेट देतो. आम्हाला शांतता हवी आहे; धार्मिक फूट नको.”

पंजाबमध्ये मोदींची सभा

शेतकऱ्यांच्या निदर्शनांदरम्यान गुरुवारी पटियालामध्ये पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी शीख इतिहास आणि वीर बाल दिवसाचा उल्लेख केला. त्यांनी पहिल्या पाच शिखांपैकी एकाचा द्वारकेशी संबंध असल्याचेही सांगितले. असे असले तरी राज्यातील ग्रामीण भागात नागरिकांमधील भाजपाविरोधातील अविश्वास कायम आहे. पटियाला येथील पंजाबी विद्यापीठाचे प्राध्यापक लखविंदर सिंह म्हणतात, “२०२० च्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींनी संसदेत शेतकऱ्यांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे लोक आजही नाराज आहेत.”

ग्रामीण भागातील नागरिकांचा भाजपाविरोधात अविश्वास कायम

ग्रामीण भागात अनेक लोक आरोप करतात, “भाजपाशी संबंधित सोशल मीडिया चॅनल शिखांविरुद्ध द्वेष पसरवीत आहेत. त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा?” असे होशियारपूर शासकीय महाविद्यालयाजवळील काही तरुणांनी सांगितले. पण, खेडोपाड्यांतही काही आवाज मोदींच्या बाजूने असल्याचे दिसते. बर्नालाजवळील शेतकरी नेते गुरमेल सिंह म्हणतात, ”शेतकरी नेते पंतप्रधानांवर का नाराज आहेत हे मला समजत नाही. पंतप्रधान किसान सन्मान-निधी योजनेचा प्रत्येकाला फायदा होतो; मला माझ्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. जर या संघटनांना पंतप्रधान आवडत नसतील, तर त्यांनी या योजनेला नाही म्हणायला हवे.”

मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाचे कॉल सेंटर

मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा तंत्रज्ञान आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. भटिंडा कार्यालयात ३० लोकांचे कॉल सेंटर आहे; ज्यांचे काम मतदारांना कॉल करणे, त्यांना केंद्रीय योजनांची माहिती देणे आणि त्यांचा अभिप्राय घेणे हे आहे. संसदेच्या प्रत्येक जागेवर असे एक कॉल सेंटर आहे; जे वर्षभर काम करते.

हेही वाचा : Loksabha Election 2024 : देशातल्या ‘इतक्या’ उमेदवारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप

निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य दुप्पट होईल, असा विश्वास सिंगला व्यक्त करतात. सर्व १३ जागांवर १ जून रोजी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही खूप मेहनत घेत आहोत. २०२७ ची वाट पाहा,” असे ते म्हणाले. पक्षाच्या काही नेत्यांनी २०२३ मध्ये जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांचा उल्लेख केला; जेथे भाजपाने १५ टक्के मतांचा वाटा मिळवला होता. तरीही ही जागा तत्कालीन आप उमेदवार सुशील कुमार रिंकू यांनी जिंकली होती. यंदा ते आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत जेव्हा भाजपा व एसएडी एकत्र लढले होते, तेव्हा त्यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या; तर काँग्रेस व आपने अनुक्रमे आठ व एक जागा जिंकली होती.