भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील भाषिक पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पहाडी नेते माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर बेग यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी उमेद मिळाली आहे. काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रशासित प्रदेशात सध्या उधमपूर आणि जम्मू लोकसभेच्या जागा भाजपाकडे आहेत.

गेल्या महिन्यात पहाडी नेते मुझफ्फर बेग पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) मध्ये परतले. परंतु गेल्या आठवड्यात जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतील त्यांच्या उपस्थितीने ते खरचं पीडीपीमध्ये आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला. बेग स्वतः पीडीपीचे संस्थापक सदस्य आहेत. ज्या पक्षाचे ते संस्थापक सदस्य आहेत, त्याच पक्षापासून ते स्वतःला वेगळे का करत आहे? असा प्रश्नदेखील अनेकांनी उपस्थित केला. ते दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा येथे पक्षाचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामील होत, मी अजून पीडीपी पक्ष सोडलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

पीडीपीमध्ये त्यांच्या परतण्याणे पक्षातील सदस्य फारसे खुश नव्हते. केवळ सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी हा प्रवेश घेतल्याचे पक्षातील काही नेत्यांचे सांगणे होते. त्यांनी मार्च २०२१ मध्ये सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता. परंतु काही महिन्यातच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

पहाडींना अनुसूचीत जमातींचा दर्जा दिल्याने भाजपाला फायदा

केंद्राने पहाडींना अनुसूचीत जमातींचा दर्जा दिल्याने, बेग यांना भाजपासोबतच्या भागीदारीत अधिक फायदा होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला पहाडींच पाठिंबा हवा आहे. पूंछ आणि राजौरीमध्ये मोठ्या संख्येने पहाडी समुदाय आहे. या दोन्ही जागा आता अनंतनागच्या दक्षिण काश्मीर संसदीय जागेचा भाग आहे. काश्मीरमधील लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा हिंदू आणि पहाडी मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न करत आहे. बारामुल्ला संसदीय जागेवरही पहाडी लोकसंख्या मोठी आहे.

पहाडी समुदायातील नेत्यांचे म्हणणे आहे की, अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याच्या या निर्णयाने ते भाजपाचे ऋणी आहेत. काही पहाडी नेत्यांनी भाजपाबरोबर असणार्‍या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाच्या पाठिंब्याने बेग हे बारामुल्ला किंवा अनंतनागमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबुबा मुफ्ती या दोघांनीही अनंतनागमधून प्रतिनिधित्व केले आहे. याच मतदारसंघातून बेग यांना उमेदवारी द्यावी यासाठी डोंगरी नेते आग्रही असल्याचे सांगितले जाते. सध्या अनंतनाग ही जागा नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसूदी यांच्याकडे आहे.

हेही वाचा : प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

दरम्यान पीपल्स कॉन्फरन्सने सोमवारी जाहीर केले की, सज्जाद लोन बारामुल्लामधून निवडणूक लढवतील. सज्जाद लोनदेखील पहाडी नेते आहेत. बेग यांनीदेखील या जागेवरून निवडणूक लढवल्यास पहाडी मतांचे विभाजन होईल. यामुळे बेग बारामुल्लामधून निवडणूक लढवणार नाही, असे सांगण्यात येत आहे.