कथित जमीन घोटाळा प्रकरणावरून झारखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी ३१ जानेवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. तसेच चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच काल मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बेपत्ता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, काही तासांत ते त्यांच्या रांची येथील निवासस्थानी दिसून आले. दरम्यान, यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसस’ला मुलाखत दिली, यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले बाबुलाल मरांडी?

“हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री असताना जर ते ४० तास बेपत्ता रहात असतील आणि ते कुठे आहेत हे कोणालाच माहिती नसेल, तर ते अशा प्रकारे गायब का झाले? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एखादा मुख्यमंत्री तपास यंत्रणेच्या भितीने पळून जात असेल, तर तो राज्याच्या हिताचे रक्षण कसे करेल? ”, अशी टीका बाबुलाल मरांडी यांनी केली.

हेही वाचा – कल्पना सोरेन कोण आहेत? झारखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा का?

“आम्ही जेव्हाही कुठे जातो, तेव्हा आमच्या सुरक्षा रक्षकांना हे माहिती असतं, मग हेमंत सोरेन तर या राज्याचे मुख्यमंत्री आहेत; मग ते कोणालाही न सांगता ४० तास बेपत्ता कसे राहू शकतात?”, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेमंत सोरेन यांच्या आरोपांनाही दिलं प्रत्युत्तर

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वी मला चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप हेमंत सोरेन यांनी केला होता. याबाबतही मरांडी यांनी प्रतिक्रिया दिली, “सोरेन यांना चौकशीसाठी बोलावण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काहीही संबंध नाही. ईडीने सोरेन यांना आज नोटीस दिलेली नाही, यापूर्वी अनेकदा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत” असे ते म्हणाले.

“जर सोरेन यांनी काही चुकीचं केलेलं नाही, तर ते चौकशीपासून दूर का पळत आहेत? आणि जर ते चौकशीपासून दूर पळत असतील तर याचा अर्थ त्यांनी नक्कीच काही तरी चुकीचं केलं आहे. आज देशातील अनेक नेत्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ते नेते चौकशीला हजरही राहिले आहेत. मात्र, हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर ते मोर्चे आणि निदर्शने करत आहेत. त्यामुळे ई़डी जर त्यांचे काम करत असेल, तर त्यात चुकीचं काय?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“निवडणुकीपूर्वी विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप चुकीचा”

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांतील नेत्यांवर तपास यंत्रणांद्वारे दबाव आणल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “आपल्याकडे ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांसारख्या तपास यंत्रणा वर्षभर काम करतात, त्यामुळे निवडणुकीपूर्वी विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप चुकीचा आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने आज नोटीस दिलेली नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जात आहेत. मात्र, ते हजर राहिलेले नाहीत. हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन केंद्रीय मंत्री असताना त्यांना कोळसा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यावेळी भाजपाचे सरकार होते का? त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी लालू यादव यांनाही तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेत होते का?”

हेही वाचा – पश्चिम बंगाल : काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’पासून तृणमूल दूर, डावे मात्र पूर्ण ताकदीने सहभागी होणार!

कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होण्याची चर्चा; मरांडी म्हणाले…

दरम्यान, हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, “मला माहिती नाही, विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणूक शक्य नाही. अशा वेळी आमदार नसलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकत नाही”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president babulal marandi critisized hemant soren over land scam in jharkhand spb
First published on: 31-01-2024 at 18:41 IST