Loksabha Election 2024 Star Campaigners उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी असे ‘स्टार प्रचारक’ चेहरे निवडतात की, ज्यांच्या प्रचारातून मतदार आकर्षित होतील. परंतु, वायएसआर काँग्रेस पक्षाने चक्क सामान्य मतदारांना स्टार प्रचारक म्हणून निवडले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी (३० एप्रिल) लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी ३७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १२ चेहरे सामान्य मतदारांचे आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे स्टार प्रचारक आंध्र प्रदेशचे लोक

चार जिल्ह्यांमध्ये आयोजिलेल्या सिद्धम प्रचारसभेची बैठक गेल्या महिन्यात पार पडली. त्यावेळी जगन यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकीत मतदारच त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक असतील. “माझे खरे स्टार प्रचारक आंध्र प्रदेशचे लोक आहेत आणि मला इतर कोणीही नको आहे,” असे ते सिद्धम मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी म्हणाले होते.

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

वायएसआरसीपीने सांगितले आहे की, हे १२ स्टार प्रचारक आंध्र प्रदेशातील सुमारे पाच कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. ‘राज्यातील प्रत्येक व्यक्ती आपली स्टार प्रचारक आहे’, अशी वायएसआरसीपीची धारणा आहे. स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आलेले हे लोक नम्र स्वभावाचे आहेत. हे लोक जगन यांचा संदेश अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतील, असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. वायएसआरसीपीचे स्टार प्रचारक असलेल्या १२ मतदारांपैकी बहुतांश मतदार गाव पातळीवरील किंवा पक्षाचे वॉर्ड-आधारित स्वयंसेवक आहेत. या सर्वांनी सत्ताधारी पक्षाच्या प्रचारात रस दाखविल्यामुळे त्यांना पक्षाचे स्टार प्रचारक करण्यात आले आहे.

१२ स्टार प्रचारकांमध्ये कोण कोण?

एनटीआर जिल्ह्यातील मायलावरम येथील गृहिणी चल्ला ईश्वरी म्हणाल्या की, रविवारी त्यांना विजयवाडा येथे वायएसआरसीपीच्या कॅम्प ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. हा फोन आला तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्याचे त्यांनी सांगितले. “निवडणुकीत वायएसआरसीपीला मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मी जगन सरकारच्या योजनांची लाभार्थी आहे. माझे आयुष्य खूप सुधारले आहे,” असे त्या म्हणाल्या .

बारा स्टार प्रचारकांपैकी आठ व्यक्ती पक्षाच्या स्वयंसेवक आहेत. त्यामध्ये चार गृहिणी, दोन शेतकरी, एक ऑटोचालक व एक टेलर, तर उर्वरित चार माजी सरकारी स्वयंसेवक आहेत. या यादीत जगन मोहन रेड्डी, राज्याचे शिक्षणमंत्री बोत्सा सत्यनारायण व राज्यसभा खासदार व्ही. विजयसाई रेड्डी यांसारख्या पक्षातील दिग्गजांचा समावेश आहे.

ऐतिहासिक निर्णय

वायएसआरसीपीच्या विशाखापट्टणमच्या उमेदवार व माजी खासदार बोत्सा झांसी लक्ष्मी यांनी या निर्णयाला ‘ऐतिहासिक’ म्हटले आहे. “जनता हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्टार प्रचारक करणे स्वाभाविक आहे. जगन यांनी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला लोकांशिवाय इतर कोणाचीही गरज नाही,” असे बोत्सा झांसी म्हणाल्या.

नेल्लोरमधील वॉर्ड स्वयंसेवक असलेल्या सय्यद अन्वर यांना सोमवारपर्यंत कल्पना नव्हती की, त्यांची वायएसआरसीपी स्टार प्रचारकांमध्ये निवड झाली आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले, “मला विजयवाडा येथे येण्यास सांगितले होते. मला यासंदर्भात काहीच कल्पना नव्हती. वायएसआरसीपीच्या निवडणूक प्रचारात मला नेहमीच हातभार लावायचा होता. कारण- मी आमच्या शहराचा विकास पाहिला आहे. गेल्या पाच वर्षांत नाले आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे.”

परंतु, यापैकी एकाही स्टार प्रचारकाला आतापर्यंत कोणतेही विशिष्ट काम देण्यात आलेले नाही. वायएसआरसीपीने त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रचार करताना स्थानिक आणि राज्य पक्षाच्या नेत्यांबरोबर जाण्यास सांगितले आहे. “मला खासदार, आमदार आणि मंत्र्यांच्या सभांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याशिवाय मला कोणत्याही विशिष्ट कार्यांसाठी नियुक्त केलेली नाही. मला वाटते की, आमच्या स्वयंसेवी उपक्रमांदरम्यान केलेल्या कामांचे फळ म्हणून या यादीत आम्हाला स्थान देण्यात आले आहे, ” असे राजमुंद्री येथील गृहिणी अनंथा लक्ष्मी म्हणाल्या.

हेही वाचा : मोदींची ‘विदाई’ बिहारमधून होईल म्हणणारा उमेदवारच देऊ लागला चारशेपारच्या घोषणा

महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला गाव आणि प्रभागस्तरीय स्वयंसेवकांना सर्व राजकीय कार्ये थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. या गोष्टीचा वायएसआरसीपीला गेल्या महिन्यात मोठा धक्का बसला. या निर्णयामुळे निवृत्तिवेतन वितरणास विलंब झाला आणि राजकारणात गोंधळ उडाला. विरोधी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी)ने निधीच्या कमतरतेमुळे विलंब झाल्याचा आरोप केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common voters are star campaigner of ysrcp rac