के. चंद्रशेखर राव यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे आणि त्यांच्या कुटुंबियांना तेलंगणाच्या राजकारणातून हद्दपार करणे हे माझे स्वप्न असेल, असे अनुमुला रेवंत रेड़्डी यांनी तुरुंगातून सुटका झाली तेव्हा २०१५ मध्ये जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीतील चंद्रशेखर राव यांच्या पराभवामुळे तब्बल आठ वर्षांनंतर रेवंत रेड्डी यांचे स्वप्न साकार झाले. आक्रमक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेड्डी यांना आता तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्याचबरोबर पक्षात एकवाक्यता राखण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभाविप, तेलुगू देशम, भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस, असा राजकीय प्रवास करणारे रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे अलीकडेच स्वीकारली. २०१५ मध्ये रेड्डी तेलुगू देशम पक्षात असताना विधान परिषद निवडणुकीत नामनियुक्त आमदाराला मतासाठी पैसे देताना पकडण्यात आले होते. तेव्हा केसीआर सरकारने रेवंत रेड्डी यांना अटक केली होती. मुलीच्या लग्नासाठी त्यांना काही तासांसाठी जामीन मंजूर झाला होता. तुरुंगातून सुटका होतानाच रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना मुख्यमंत्रीपदावरून पदच्यूत करण्याचे स्वप्न जाहीर केले होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बहुमत मिळाले आणि केसीआर यांना सत्ता सोडावी लागली.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना शून्य प्रतिसाद

रेवंत रेड्डी हे २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हापासून रेड्डी आणि काँग्रेसमधील जुन्याजाणत्या नेत्यांचे सूर जुळले नव्हते. रेड्डी यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काही नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ५४ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

विद्यार्थी दशेत अभाविपशी जोडले गेलेले रेवंत रेड्डी कोणत्याच राजकीय पक्षात स्थिरावले नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पराभव करणे या एकमेव उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीमधूनच झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पुढे त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देशममध्ये प्रवेश केला होता. चंद्राबाबूंचे ते विश्वासू सहकारी गणले जाऊ लागले. तत्कालीन मुख्यमंत्री वाय. चंद्रशेखर राव सरकारच्या विरोधात रेवंत रेड्डी यांनी आघाडी उघडली होती.

चंद्रशेखर राव यांना सत्तेवरून दूर करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या रेवंत रेड्डी यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी मतदारसंघातून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, घराणेशाहीवर रेवंत रेड्डी तुटून पडले होते. त्यातूनच केसीआर सरकारने त्यांना अटकही केली होती.

हेही वाचा – शिवसेनेच्या घटनेत मुख्यनेता पद आहेच कुठे, ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही अपात्रतेवर सुनावणी

निवडणूक प्रचारात रेवंत रेड्डी यांनी केसीआर सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. रेवंत रेड्डी यांना अटक करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या विरोधात आता मुख्यमंत्री म्हणून रेड्डी कारवाई करणार का, याची लोकांना उत्सुकता आहे. पण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर रेवंत रेड्डी यांनी सुडाचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे तेलंगणात नियोजन करण्यात रेड्डी यांची भूमिका महत्त्वाची होती. राहुल गांधी यांच्या यात्रेला तेलंगणात चांगला प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीपूर्वी राज्य काँग्रेसमधील नेत्यांची तोंडे चोहोबाजूला होती. रेवंत रेड्डी यांचे अन्य नेत्यांशी अजिबात पटत नव्हते. पण निवडणूक जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न, के. चंद्रशेखर राव यांना लक्ष्य केल्याने काँग्रेसला झालेला फायदा यातून पक्षाने रेवंत रेड्डी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे. तेलंगणात काँग्रेसने लोकांना भरपूर आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता करण्याबरोबरच लोकांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान रेड्डी यांच्यासमोर असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader revanth reddy dream has finally come true print politics news ssb