नागपूर: बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान सभेमध्ये रविवारी भाषण करताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भूजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाष्य केले.

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, छगन भुजबळ, मी अथवा इतरही आमच्यातल्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र काम केले आहे. दुसरीकडे शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून ते मराठा आहेत. छगन भूजबळ हे ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी भेट घेण्यात काही अडचण नाही. या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.

हेही वाचा : दुष्टचक्र कायम…दिवसागणिक एक आत्महत्या; १२० शेतकऱ्यांनी…

दरम्यान, राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तिढा वाढत आहे. दोन्ही समाजाचे आंदोलन उग्र होत आहे. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे राज्यात शांतता रहावी म्हणून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली असल्यास चांगले आहे. महाराष्ट्रात सर्वच जाती- धर्म, पंथाचे लोक एकत्र आनंदाने राहतात. त्यामुळे पुढेही ही स्थिती रहायला हवी. नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी दोन उमेदवार निवडून आणले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३९ आणि २ अपक्ष असे एकूण ४१ मते होती. परंतु पवार यांनी इतर पक्षातील अतिरिक्त ६ मते मिळवून एकूण ४७ मते मिळवली. त्यातून ते राष्ट्रीय नेते असल्याचेही सिद्ध होते. दरम्यान बारामतीमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झाली. त्यात मीही उपस्थित होतो. भर पावसातही लोकांची गर्दी व प्रतिसाद बघता जनता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचेही आत्राम यांनी सांगितले.

तिसऱ्या आघाडीचा प्रश्नच नाही

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, एआयएमआयएम आणि वंचित या दोन पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार होत असल्याची चर्चा आहे. त्यावर धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, राज्यात महायुती भक्कम आहे. कालच्या बारामतीतील सभेतही आमचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी त्याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडून लढून २०० हून जास्त जागा जिंकू, असेही आत्राम म्हणाले.

हेही वाचा : कुपोषण निर्मूलनाचा ‘वाशीम पॅटर्न’, वाशीम जिल्हा राज्यात अव्वल; पाच महिन्यांत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडचिरोलीत ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून कारखाना

गडचिरोलीतील वडलापेठ गाव येथे ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सूरजागड इस्मात कंपनीचा कारखाना उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन १७ जुलैला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या या कारखान्यातून येत्या एक- दोन वर्षांत सुमारे ८ ते १० हजार तरुणांना रोजगार मिळेल. दरम्यान या भागात मायनिंगशी संबंधित कामे सुरू झाल्यावर आतापर्यंत ४ ते पाच हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचेही आत्राम म्हणाले.