उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी त्यांच्या जागावाटप करारावर शिक्कामोर्तब केलं. याला आठवडाभराहून अधिक काळ लोटला तरी राज्यात अद्यापही काँग्रेसची कोंडी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करारानुसार, सपाने ८० पैकी १७ जागा काँग्रेसला दिल्या आहेत, उर्वरित ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहे. परंतु, राज्यातील काँग्रेसच्या एका गटानुसार, पक्षाला हव्या असलेल्या जागा मिळाल्या नाहीत, असे त्यांचे सांगणे आहे. या नेत्यांनी १९८० नंतर कधीही न जिंकलेल्या सहा जागांचा उल्लेख केला. प्रयागराज, अमरोहा, बुलंदशहर, सहारनपूर आणि देवरिया या जागांवर १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसने शेवटचा विजय नोंदवला होता, तर १९८९ मध्ये सीतापूर मतदारसंघातून पक्षाने शेवटचा विजय मिळवला होता. अशा अनेक जागा आहेत जिथे काँग्रेसला सपाकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा वाटत नाही, कारण या जागांवर सपाचे मतदारही कमी आहेत.

उत्तर प्रदेश जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष

१९९६ मध्ये सीतापूर मतदारसंघात सपाने विजय मिळवला होता. हा मतदारसंघ तेव्हापासून बसपा आणि भाजपाच्या उमेदवारांनी जिंकला आहे. सीतापूरमध्ये कुर्मी मतांची लोकसंख्या लक्षणीय आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, त्यांना लखीमपूर खेरी मतदारसंघ हवा होता. या मतदारसंघात प्रमुख कुर्मी (ओबीसी) नेते आणि माजी सपा खासदार रवी वर्मा आणि त्यांची मुलगी पूरवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु लखीमपूर खेरीऐवजी काँग्रेसला शेजारची सीतापूर जागा देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, पक्ष आता वर्मा यांना सीतापूरमधून निवडणूक लढवण्यास सांगतील. पक्षाला अशी आशा आहे की, ते या जागेवरील कुर्मी मतदारांना आकर्षित करतील. तसेच शेजारच्या बाराबंकीयेथील कुर्मी मतदारांवरदेखील याचा परिणाम होईल, जो काँग्रेससाठी लाभदायक ठरेल. कारण या जागेवरून माजी खासदार पी.एल पुनिया यांचा मुलगा तनुज पुनिया निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

सहारनपूर येथे २००४ मध्ये सपा नेते रशीद मसूद शेवटचे जिंकले होते. तेव्हापासून ही जागादेखील बसप किंवा भाजपाने जिंकली आहे. २०२० मध्ये रशीद यांच्या निधनानंतर, इम्रान मसूद या भागातील एक अल्पसंख्याक चेहरा झाले, जे आता काँग्रेसबरोबर आहेत आणि संभाव्य उमेदवारदेखील आहेत. प्रयागराज हे शेवटचे २००४-२००९ मध्ये सपाच्या रेवती रमण सिंह यांनी जिंकले होते. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ही जागा जिंकली. ही जागा आता काँग्रेसला देण्यात आली आहे. ज्यामुळे पक्षापुढे मोठे आव्हान आहे. काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रयत्नांनंतरही अल्पसंख्याक मतांची टक्केवारी २५ टक्क्यांहून अधिक असलेल्या दोनचं जागा सपाने पक्षाला दिल्या, त्या म्हणजे सहारनपूर आणि अमरोहा.

अल्पसंख्याक जागा सपाकडे

अमरोहा ही जागा १९९९ मध्ये सपाने शेवटची जिंकली होती. या जागेवर जाट मतदारही आहेत. १९९९ नंतर ही जागा भाजपा, आरएलडी किंवा बसपने जिंकली आहे. मात्र, यावेळी बसपचे विद्यमान खासदार दानिश अली पक्षात सामील होऊन उमेदवारी मिळवणार असल्याने काँग्रेसला ही जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. “सपाने अल्पसंख्याक मतदार असलेल्या बहुतेक जागा स्वतःकडे ठेवल्या आहेत. मथुरा, गाझियाबाद, बुलंदशहर, बांसगाव, प्रयागराज या जागा आम्हाला कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय दिल्या गेल्या आहेत, असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितले.

“मन चाही सीट्स नही मिली (आम्हाला हव्या त्या जागा मिळाल्या नाहीत),” असे ते म्हणाले. अमेठी आणि रायबरेली वगळता कानपूर, सहारनपूर, अमरोहा, महाराजगंज आणि देवरिया यांसारख्या बहुतांश जागा काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये युती टिकवून ठेवण्यासाठी घेतल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेते म्हणतात की, ते मुरादाबाद आणि लखीमपूर खेरीसारख्या जागांची मागणी करत होते, परंतु त्याऐवजी त्यांना बुलंदशहर, गाझियाबाद आणि सीतापूर या जागा देण्यात आल्या.

उत्तर प्रदेश काँग्रेसने अद्याप आपली राज्य निवडणूक समितीदेखील स्थापन केलेली नाही. या समितीतचं संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा होते; ज्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) च्या केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) कडे शॉर्ट-लिस्टेड नामनिर्देशितांची यादी पाठवली जाते. सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत माजी खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांसारख्या काही प्रमुख काँग्रेस चेहऱ्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शविली नाही.

हेही वाचा : प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

“आम्हाला मथुरासारख्या जागा मिळाल्या. मथुरेत आरएलडीचा पाया भक्कम आहे. आरएलडी आता एनडीएचा भाग आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आम्ही आमचा उमेदवार उभा करू, परंतु येथे मते एकत्र करणे कठीण आहे,” असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. “आम्हाला भीती वाटते की योग्य स्थानिक चेहऱ्यांच्या अनुपस्थितीत, पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी बाहेरील लोकांवर अवलंबून राहावे लागेल,” असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leaders are not happy with seat allocation in uttar pradesh rac