आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. अशातच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, झारखंडमधील काँग्रेसच्या एकमेव खासदार गीता कोरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारी (२६ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झारखंडच्या सिंहभूम मतदारसंघाच्या खासदार गीता कोरा या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोरा यांच्या पत्नी आहेत. गीता कोरा यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याने आता काँग्रेस-जेएमएम युतीमध्ये विजय हंसदक यांच्या रूपाने केवळ एकच खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेएमएम युतीने १४ पैकी दोन जागांवर; तर भाजपाने १२ जागांवर विजय मिळविला होता.

हेही वाचा – मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका, मंदिराच्या उत्पन्नावर कर लावण्याचे विधेयक फेटाळले, दुसऱ्यांदा मांडण्याच्या तयारीत

महत्त्वाचे म्हणजे झारखंडच्या गीता कोरा यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री मधू कोरा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मधू कोरा यांच्यावर २०१७ साली झालेल्या कोळसा घोटाळ्यात अनियमितता केल्याचा आरोप आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषीही ठरविण्यात आले आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- गीता कोरा यांच्या पक्षात येण्याने भाजपाला पूर्व सिंहभूम, पश्चिम सिंहभूम व सरायकेला-खरसावन या तीन जिल्ह्यांमध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यास मदत होईल. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला या भागांत पराभवाचा सामना करावा लागला होता.

कोरा दाम्पत्याचे स्वागत करताना भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने मधू कोरा यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी केला आहे. मधू कोरा हे २००६ मध्ये यूपीएतील घटक पक्षाच्या पाठिंब्याने झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते. त्यापूर्वी ते अपक्ष आमदार होते. मात्र, २००८ यूपीएतील घटक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने आपला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मधू कोरा यांचे सरकार कोसळले. हे एक प्रकारे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप अनेकांनी केला होता.

गीता कोरा यांच्या निर्णयानंतर काँग्रेसनेही या संदर्भात प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले आहे. आम्हाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्या काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र, त्या थेट पक्ष सोडून जातील, याची कल्पना नव्हती. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी रविवारी (ता. २५ फेब्रुवारी ) पक्षाच्या एका बैठकीत हजेरीही लावली होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

हेही वाचा – उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी

गीता कोरा यांनी २००९ साली राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जय भारत समानता पक्षाच्या उमेदवार म्हणून जगन्नाथपूर येथून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. जय भारत समानता पक्षाची स्थापना त्यांचे पती मधू कोरा यांनी भाजपातून बाहेर पडल्यानंतर केली होती. २०१४ सालीही गीता कोरा यांनी या जागेवर पुन्हा विजय मिळवला. २०१८ मध्ये जय भारत समानता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. सद्य:स्थितीत गीता कोरा या संसदेतील सामाजिक न्याय व सक्षमीकरणाच्या स्थायी समितीच्या सदस्य आणि मानव संसाधन विकासावरील सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress lone jharkhand mp geeta kora quits party to joins bjp spb
First published on: 27-02-2024 at 12:22 IST